केएससीए 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियन जिमखाना संघाने चॅलेंजर युथ व स्पोर्ट्स संघाचा दहा गड्यांनी तर सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा 128 धावांनी पराभव करुन चार गुण मिळविले. आदित्य जाधव व मोहम्मद हमजा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए ऑटोनगर येथील मैदानात खेळविण्यात आलेल्या सामन्यात चॅलेंजर युथ आणि स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्वगडी बाद 66 धावा केल्या.
त्यात प्रतिक संभाजीने 2 चौकारासह 12 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. युनियन जिमखानातर्फे इंद्र प्रजापतीने 10-4, मोहम्मद हमजाने 16-4 तर अर्जुन प्रधानने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाने 9 षटकात बिनबाद 67 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. मोहम्मद हमजाने 4 चौकारासह नाबाद 28, साईराज पोरवालने 3 चौकारासह नाबाद 25 धावा केल्या. हमजा व साईराज या सलामीवीर जोडीने नाबाद 67 धावांची भागिदारी केली. दुसऱ्या सामन्यात सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 34 षटकात सर्वगडी बाद 158 धावा केल्या.
त्यात समर्थ पाटीलने 7 चौकारासह नाबाद 51, मीरसाब बी.ने 9 चौकारासह 47 तर पवन धोंगडीने 3 चौकारासह 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी तर्फे अमय भोसलेने 44-5, कार्तीक मिटगार व गणेशकुमार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा डाव 14.3 षटकात 30 धावांत आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. सिग्नीचतर्फे आदित्य जाधवने 13 धावांत 6 गडी बाद करत निम्म्याहून अधिक संघ गारद केला. त्याला अद्वैत भट्टने 17 धावांत 4 गडी बाद करुन सुरेख साथ दिली.









