तन्वी गावडे उत्कृष्ट खेळाडू तर समृद्धी उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फॅब फुटबॉल क्लब आयोजित फॅब लीग चषक मुलींच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिग्नीचर संघाने एमएस संघाचा 3-1 असा पराभव करुन फॅब चषक पटकाविला. तन्वी गावडे उत्कृष्ट खेळाडू, समृध्दी उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. सक्षम स्पोर्ट्स एरीनाच्या टर्फ मैदानावरती घेण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमएस संघाने बिटा संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या 25 व्या मिनिटाला झोया मुल्लाने एकमेव गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिग्नीचर संघाने सेंट झोसेफ संघाचा 3-0 असा पराभव केला. 11 व्या मिनिटाला धनश्री कदमने पहिला गोल केला. 23 व्या मिनिटाला वसुंधराने दुसरा तर 33 व्या मिनिटाला प्रेरणाने तिसरा गोल करुन 3-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
फॅब लीग चषक स्पर्धेचा अंतिम सामना सिग्नीचर स्पोर्ट्स क्लब व एमएस संघात झाला. या सामन्यात पहिल्या मिनिटांपासूनच दोन्ही संघाने आक्रमक चढाया सुरू केल्या. 21 व्या मिनिटाला सिग्नीचरच्या धनश्री कदमच्या पासवर गोल करुन 1-0 ची आघाडी मिळविली. 27 व्या मिनिटाला धनश्री कदमच्या पासवर साक्षी चिटगीने दुसरा गोल करुन पहिल्या सत्रात 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 31 व्या मिनिटाला एमएस संघाच्या झोया मुल्लाच्या पासवर अॅलिशा ब्रोजेसने गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. 38 व्या मिनिटाला वसुंधराच्या पासवर किंजलने तिसरा गोल करुन 3-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून दर्शन ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, डायरेक्टर मुग्धा देसाई,केएलएस स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका नाईक व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक-देसाई, दर्शनच्या अश्विनी नावगेकर यांच्या हस्ते विजेत्या, सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबला व उपविजेत्या एमएस संघाला चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बिटा संघाने सेंट जोसेफचा पराभव करुन तिसरा क्रमांक मिळविला. उत्कृष्ट संघ सेंट जोसेफ-संतीबस्तवाड, उत्कृष्ट खेळाडू तन्वी गावडे-सिग्नीचर, उत्कृष्ट गोलरक्षक समृद्धी-बिटा, उत्कृष्ट मिडफिल्टर धनश्री कदम-सिग्नीचर, उत्कृष्ट फावॉर्ड झोया मुल्ला-एमसएस, उत्कृष्ट डिफेंडर वसुंधरा चव्हाण-सिग्नीचर यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुरस्कर्ते रेडेकर, ओमकार कुंडेकर, शुभम यादव, यश सुतार, अमरदीप पाटील, विवेक सनदी आदींनी परिश्रम घेतले.









