ट्रॅफिक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील खडेबाजार कॉर्नर येथील सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचवेळा सिग्नलमधून आकडे दर्शवितात तर काहीवेळा दिशादर्शक बाण दाखविले जात आहेत. त्यामुळे या सिग्नलची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. रमजान महिना सुरू असल्यामुळे खडेबाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून बरीच वाहने खडेबाजार येथे जातात. परंतु सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने अडचणी येत आहेत. काहीवेळा आकडे दर्शविले जात आहेत. तर काहीवेळा बाण दर्शविले जात आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, या सिग्नलची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
गोगटे सर्कल येथेही बिघाड
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या गोगटे सर्कल परिसरातही सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. बऱ्याचवेळा योग्य दिशा दाखविल्या जात नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. काही वाहनचालकांनी याची तक्रारही नोंदविली असून, सिग्नलची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.









