वाहतूक कोंडीची समस्या दूर झाल्याने समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी ट्राफिक सिग्नल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र आरटीओ चौक, धर्मवीर संभाजी चौक आणि गोगटे चौकातील सिग्नल सुविधा बंद झाली होती. यापैकी गोगटे चौकातील सिग्नल सुविधा पूर्वरत सुरू करण्यात आली असून वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खानापूर रोड हा महत्त्वाचा रस्ता असल्याने अवजड वाहनांसह लहान वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र या प्रमुख रस्त्यावरील गोगटे चौकातील सिग्नल सुविधा गेल्या कित्येक महिन्यापासून बंद होती. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी रेल्वेस्टेशन, खानापूर रोड तसेच काँग्रेस रोड असे रस्ते मिळत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषत: उड्डाणपुलावरून संचयनी चौकाकडे येणारे वाहनधारक भरधाव येत असतात. तसेच काँग्रेस रोडने रेल्वेस्थानकाकडे वाहनधारक वळत असतात. अशावेळी चौकात अपघात घडण्याची शक्यता अधिक होती. काही वेळा लहान लहान अपघात या ठिकाणी घडत होते. तसेच चारही बाजुंनी एकाचवेळी वाहनधारक येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. अपघात टाळण्यासाठी तसेच होणारी कोंडी टाळण्यासाठी सिग्नल सुविधा सुरू करण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात आली होती.
तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून येथील समस्येकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन गोगटे चौकातील ट्राफिक सिग्नलची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारपासून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









