ऑनलाईन टीम/तरुण भारत
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जाहीर वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्षासाठी तीन पर्यायी नावं आणि निवडणूक चिन्हासाठी तीन नावं सूचविली आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंनी आज माहिती दिली. चिन्हासाठी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे पर्याय ठाकरेंनी सुचवले असून नावासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे तीन पर्याय देण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
निवडणूक आयोगाने लवकरात लवकर नाव आणि चिन्हाबाबत निर्णय घ्यावा अशी विनंतीही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. मी डरणारा नाही. जनता जो फैसला करेल तो मला मान्य आहे. प्रत्येक शिवसैनिक राबत आहे. तुम्हीच सर्वोच्च आहात. लोकशाहीत जनताजनार्दन श्रेष्ठ आहेत. लोकदरबाकरात मला जायचं आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर चिन्ह आणि नाव द्यावं. आपण आधीच निवडणूक आयोगाकडे आपले पर्याय सोपवले आहेत. निवडणूक आयोगाने ते जाहीरही केले. शिंदे गटाचे अद्यापही पर्याय निवडणूक आयोगाने जाहीर केले नाहीत, याचा अर्थ त्यांनी अजूनही नाव आणि चिन्हासाठी पर्याय सुचवलेले नाहीत. परंतु, निवडणूक आयोगाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हे ही वाचा : ४० डोक्यांच्या रावणानं प्रभु श्रीरामाचं शिवधनुष्य गोठवलं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुढे ते म्हणाले की, आज कोजागिरी आहे. आपण म्हणतो की रात्र वैराची आहे. पण सध्या दिवस-रात्र दोन्ही वैराची आहेत. त्यामुळे झोपू नका, शांत राहा, आत्मविश्वासाने मोठी लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेन, मी प्रत्येक लढाईला सामोरा गेलेलो आहे. ही लढाईसुद्धा जिंकायची आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.