ज्ञानवापी’मध्ये गेल्या दोन दिवसातील पाहणीनंतर दावा : भिंती-खांबांवरील कोरीव कामाचे व्हिडिओ चित्रीकरण
वृत्तसंस्था/ वाराणसी
वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षण शुक्रवारपासून सुरू झाल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) त्रिशूल, स्वस्तिक असे हिंदू प्रतिकांचे नमुने सापडल्याचा दावा केला जात आहे. ज्ञानवापी मशीद हिंदू मंदिरावर बांधली आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जात असताना ‘एएसआय’ने ज्ञानवापी संकुलाच्या भिंती आणि खांबांवर कोरलेल्या त्रिशूल, स्वस्तिक, घंटा आणि फुल यांसारख्या चिन्हांचे व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण केले आहे. दरम्यान, ज्ञानवापी पॅम्पसजवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी ‘एएसआय’ला चार आठवड्यांचा अतिरिक्त वेळ दिला. ‘एएसआय’च्या पथकाकडून पहिल्या दिवशी भिंती, घुमट आणि खांबावरील चिन्हांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्ञानवापी पॅम्पसच्या चार कोपऱ्यांवर डायल टेस्ट इंडिकेटर लावण्यात आले असून पॅम्पसच्या विविध भागांची खोली आणि उंची मोजण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ‘एएसआय’ टीममध्ये 37 लोकांचा समावेश होता. ‘एएसआय’च्या पथकामध्ये एकूण 41 सदस्य असून त्यांना चार टीममध्ये विभागण्यात आले होते. शनिवारी तळघराचे सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास पथक ज्ञानवापी येथे पोहोचले होते. त्यांचे काम सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होते.
पहिल्या दिवसाच्या सर्वेक्षणात सात तासांहून अधिक काळ परिसराचा आकार निश्चित करण्यात आला व मोजमापही करण्यात आले. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन हेही ज्ञानवापी येथे पोहोचले असून आजपासून मीही या सर्वेक्षणात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षणादरम्यान ‘एएसआय’ पथकाला अनेक गोष्टी कळणार आहेत. अंतर्गत रचना, आयर्मान, निर्मितीचा काळ अशा बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘एएसआय’कडून केला जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एएसआयला खोदकाम न करता सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. पहिल्या दिवशी हे सर्वेक्षण सुमारे 7 तास चालले. तर शनिवारी दुसऱ्या दिवशी जवळपास 9 तास ‘एएसआय’च्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. सर्वेक्षणाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करावा आणि तो सार्वजनिक करू नये, असे मुस्लीम पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.









