दोडामार्ग – वार्ताहर
खेकड्यांच्या प्रजातींमध्ये अतिशय दुर्मिळ समजला जाणारा जंगली खेकडा अर्थात ‘घाटियाना बोट्टी’ या खेकड्याचे दुर्लभ दर्शन आज दोडामार्ग शहरा नजीकच्या गोवा हद्दीतील साळ गावाच्या जंगलात झाले. मणेरी येथील प्रशांत गवस हा युवक त्या परिसरात भटकंती करत असताना गुलाबी रंग असणारा हा खेकडा त्याला पहावयास मिळाला.
प्रशांत गवस हा आज नेहमीप्रमाणे साळ परिसरात भटकंती करायला गेला असता त्याला हा जंगली खेकडा आढळून आला. कुतूहलापोटी या खेकड्याचे त्याने बारीक निरीक्षण केले व आपल्या मोबाईल मध्ये छायाचित्रही घेतले. सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहा. प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी दिलेल्या महितीनुसार हा गुलाबी रंगाचा खेकडा पश्चिम घाटामध्ये सापडणारा असून ही प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. घाटियाना बोट्टी असे त्याचे वैज्ञानिक नाव असून हा खेकडा जंगलात आढळतो.
सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये असलेल्याकडे कपारी मध्ये दगडांच्या खाचांमध्ये, झाडांच्या बुंध्याखाली हा खेकडा सापडतो. ही प्रजाती दुर्मिळ असून तिचा शोध 2018 रोजी लागलेला आहे .झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डाॅ.एस के पटी व माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी या खेकड्याची जात 2018 मध्ये सह्याद्री मधुन शोधून काढली. पश्चिम घाटामध्ये जवळजवळ 11 प्रकारचे जंगली खेकडे सापडतात .जे खेकडे नदी व ओहळा मध्ये सापडतात त्या खेकड्यांपेक्षा लहान परंतु विविध रंगाचे हे खेकडे असतात. 0यातील काही प्रजाती झाडांच्या बुध्यांमधील ढोलींमध्ये राहातात अशीही माहिती प्रा. डॉ. मर्गज यांनी दिली.









