वार्ताहर/कुद्रेमनी
जंगली अस्वलाच्या वावरामुळे कुद्रेमनी, ढेकोळी, सुरुते गावातील शेतवडी भागात भीतीची व धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर गावांच्या पश्चिम बाजूला जंगल व डोंगराळ भाग आहे. जंगलाच्या पायथ्यालगत गावकाऊल नंबर, साऊरतळे, बेरडशेत, वरचे शेत, डोणी शेतवडीचा मोठा भाग आहे. या भागात दोन-चार दिवस जंगली अस्वलाचा संचार असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे या भागात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतवडी भागात जाणे धोक्याचे
शेतवडी भागात रताळी, नाचना, ऊस, भात, बटाटा यासारखी पिके मोठ्या प्रमाणात पिकविली जातात. गवे, रानडुक्कर या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांच्या रक्षणासाठी शेतात जावून मुक्काम करावा लागतो. दिवसा शेतीकामासाठी शेतकरी आपल्या जनावरांसह शेताकडे जात असतात. मात्र सध्या अस्वलाचा संचार या भागात होत असल्याने सदर शेतवडी भागात जाणे धोक्याचे बनले आहे. कुद्रेमनी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष विनायक पाटील व ढेकोळी गावचे पोलीस पाटील जोतिबा कणगुटकर यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.









