जन्मापासून नेत्रहीन असणारी एक मुलगी. तिच्यावर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यामुळे सात वर्षे काहीही बघू न शकलेल्या या मुलीचे डोळे परत आले. जन्मानंतर प्रथमच तिने आपल्या आईला पाहिले. एकमेकींना मिठी मारून दोघींनी मनसोक्त रडून घेतले. अशा प्रकारचा भावनेने ओथंबलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी तो पाहून तशाच भावनाप्रधान प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जन्मापासून नेत्रहीन असलेल्या या मुलीने जेव्हा पहिल्यांदा जग पाहिले, तेव्हा ती काही क्षण आश्चर्यात बुडून गेल्याचे दिसून आले. तिच्या तोंडून शब्द फुटेनासा झाला. तिच्या अवतीभवतीच्या अनेक वस्तू आणि माणसे जी तिने केवळ ऐकली होती, ती आज तिला प्रत्यक्ष बघावयास मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सोशल मिडियावर सध्या हा व्हिडिओ अत्याधिक लोकप्रिय झाला आहे. 70 लाखांहून अधिकांनी तो पाहिला आहे. पंधरा हजारहून अधिक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असंख्य लोकांनी तो रिट्विट केला आहे. ही घटना भारतातीलच आहे हे समजून येते. पण नेमकी कोणत्या गावातील आहे, हे या व्हिडिओवरून कळून येत नाही. त्यामुळे अनेकांनी या हृद्य घटनेच्या स्थानाची चौकशी केली आहे. एकंदर सध्या हा क्हिडिओ लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.









