काम संथ गतीने,ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू
पाचगाव प्रतिनिधी
पाचगाव परिसरात जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खुदाईमुळे पाचगाव परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
पाचगाव परिसरात जलजीवन योजनेअंतर्गत सुमारे 65 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खुदाईचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकून ती परत मुजवण्यात येत आहे. ही पाईपलाईन व्यवस्थित न मुजवल्यामुळे रस्त्याच्या बाजूला मुरुम पसरला. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्ता क्रॉस करून पाईपलाईन टाकली आहे. अशा ठिकाणी तर मोठे मुरमाचे स्पीड ब्रेकर झाले आहेत. अशा ठिकाणावरून ग्रामस्थांना चालत जातानाही कसरत करावी लागत आहे. अशा ठिकाणी मुरमावरून टू व्हीलर घसरल्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. पाचगाव मधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुळातच अरुंद असणारे रस्ते या खुदाईमुळे आणखी अरुंद झाले आहेत.
जल जीवन योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ठेकेदार अपुऱ्या यंत्रणेसह निष्काळजीपणे काम करत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात येणाऱ्या खुदाईवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्रपट दिसत आहे.लोकनियुक्त सरपंच प्रियंका पाटील यांनी ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन ठेकेदाराला गतीने आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पाईपलाईन मुजवताना ठेकेदाराचा निष्काळजीपणा
पाचगाव परिसरात जल जीवन योजनेअंतर्गत खुदाई करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर ती व्यवस्थित रित्या न मुजवल्यामुळे रस्त्यावर मोठे मुरमाचे स्पीड ब्रेकर तयार झाले आहेत. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. असं शिवसेना ठाकरे गट करवीर तालुका उपप्रमुख विवेक काटकर यांचं म्हणणं आहे.









