वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी आयपीएलच्या माध्यमातून दशकभरानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन करण्यास भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू सज्ज झाला असून ही लीग केवळ भारताचाच नव्हे, तर इतरही टी-20 विश्वचषक संघ निश्चित करण्यास मदत करेल, असे मत त्याने व्यक्त केले आहे.
राजकारणातील दशकभराहून अधिक काळाच्या कारकिर्दीनंतर सिद्धू आणि त्याचे ‘सिद्धुइझम’ जूनमध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषकापूर्वीच्या ‘आयपीएल’पासून पुन्हा ऐकायला, पाहायला मिळणार आहे. आयपीएल विश्वचषकाची तयारी घडवेल. सध्या आणखी क्रिकेट काही घडत नाही. जगाच्या नजरा आयपीएलकडे लागल्या आहेत. केवळ भारतीय नाही, तर परदेशी खेळाडूही त्यातूनच ‘टी-20’ विश्वचषकासाठीच्या संघात जागा मिळवू शकतात, असे सिद्धूने आयपीएलचे अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने घडवून आणलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 2022 च्या स्पर्धेपासून जास्त टी-20 क्रिकेट खेळलेले नाहीत. पण अमेरिका आणि कॅरिबियन भूमीत होणार असलेल्या विश्वचषकासाठीच्या संघात असतील. हे अनुभवी फलंदाज अजूनही टी-20 संघात मोलाची भर घालू शकतात का असे विचारले असता सिद्धू म्हणाला की, त्यांची तिथे गरज लागेल. ते क्रिकेट विश्वातील दिग्गज आहेत. फॉर्म हा सकाळच्या दवासारखा असतो. तो तुम्हाला चकवा देऊ शकतो, परंतु या खेळाडूंच्या दर्जावर शिक्कामोर्तब झालेले आहे, असे त्याने पुढे सांगितले.









