सांखळीतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्र. 3 मधील लढत ठरली लक्षवेधी
डिचोली : सांखळी नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक हि अत्यंत प्रतिष्ठेची व निकालही बराच लक्षवेधी ठरला असला तरी त्याला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले ते हाऊसिंगबोर्ड प्रभागात भाजपने सिद्धी प्रभू यांनी मिळविलेल्या विजयामुळे. या प्रभागात हाऊसिंगबोर्ड भागाचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे याठिकाणी निवासस्थान असल्याने भाजपसह मुख्यमंत्र्यांसमोरही येथे जिंकण्याचे आव्हान होते. ते सिध्दी प्रभू यांनी लीलया पेलले. साखळी नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणुकीत प्रभाग 3 मधील सिद्धी प्रभू व सुनिता वेरेकर यांच्यातील व प्रभाग 4 मधील धर्मेश सगलानी व रश्मी देसाई यांच्यातील लढतींवर संपूर्ण सांखळीचे व डिचोली तालुक्याचेही लक्ष लागून होते. या दोन्ही प्रभागांचा निकालही सर्वांना धक्काच देणारा ठरलाच. पण सिद्धी प्रभू यांनी खेचून आणलेला विजय हा या संपूर्ण बाराही प्रभागांमध्ये लक्षवेधी ठरला. अर्थातच त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभलेच. शिवाय या प्रभागाचे प्रभारी कालिदास गावस यांनीही मोलाचे कार्य केले. हाऊसिंगबोर्ड हा भाग पूर्णपणे शिक्षित नागरिकांचा भाग. या भागामध्ये लोकांना धमक्या देणे व मते मिळविणे हि प्रक्रिया तशी भाजपलाच आव्हान देणारी ठरली असती. गेली अनेक वर्षे सांखळीत सामाजिक क्षेत्रात किम करताना सिद्धी प्रभू यांनी अनेक कुटुंबांमधील अंतर्गत वाद मिटविण्याचे काम केले आहे. अनेक जोडप्यांमध्ये काही कारणांमुळे घटस्फोट मिटवून सामंजस्याने त्यांचे पुनर्वसन केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर प्रवेशासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. आरोग्य सेवेतही त्यांनी योगदान देताना अनेक लोकांना आजारपणात स्वत: तसेच इतरांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य केले आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अनेकांना मदत केली आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून लोकांनी त्यांना मतदान केल्याचे नंतर स्पष्ट झाले. प्रभाग 3 मध्ये त्यांच्या विरोधात धर्म व जातीचे राजकारणही आणण्यात आले. माजी नगरसेविका शुभदा सावईकर यांना डावलल्याने त्याचा परिणाम सिध्दी प्रभू यांच्या विजयावर होणार असल्याचेही बोलले जात होते. कारण सावईकर या तशा प्रचारात सक्रिय दिसल्याच नाही. तसेच या प्रभागातील दोन माजी नगरसेवकांनीही सिद्धी प्रभू यांच्या विजयात अडचण आणण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात मोठा अपप्रचार करण्यात आला होता. तरीही त्यांनी आपल्या समाजसेवी कर्तबगारीवर विजय खेचून आणला. या विजयातून त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा गड राखला व प्रतिष्ठाही राखली.
लोक समाजसेवेला न्याय देतात!
या प्रभागात वास्तव्य करण्राया हिंदू धर्मियांबरोबरच मुस्लीम व ख्रिश्चन धर्मिय लोकांनीही त्यांनाच मतदान केल्याचे त्यांना मिळालेल्या 96 मतांची आघाडी पाहिल्यावर लक्षात येते. 300 मतांचा आकडा सिद्धी यांनी सहज पार करत 334 मते मिळवली. तर विरोधातील सुनिता वेरेकर यांना 238 मतांवर समाधान मानावे लागले. खऱ्या समाजसेवेला लोक सदैव न्याय देतात. व जाती धर्माचे राजकारण सांखळीत चालत नाही. हे लोकांनी दाखवून दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया सिध्दी प्रभू यांनी दिली.









