जिल्हाधिकाऱ्यांचीही परवानगी : भाविकांना उपस्थित राहण्याचे यात्रा कमिटीचे आवाहन
बेळगाव : राजहंसगड येथे गुढीपाडव्यानिमित्त बुधवार दि. 22 रोजी पारंपरिक पद्धतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन राजहंसगड पंचकमिटीने यात्रेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना करत यात्रोत्सव करण्यास परवानगी दिल्याने पारंपरिक पद्धतीने यात्रा होणार आहे. सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश बजावत 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राजहंसगडावर प्रवेशबंदीचा आदेश दिला होता. यामुळे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर होणारी राजहंसगडावरील यात्रा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मागील अनेक वर्षांपासून गुढीपाडव्यादिवशी राजहंसगडावर मोठी यात्रा भरते. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी शेकडो भाविक गडावर उपस्थित असतात. त्यामुळे यात्रेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी, किल्ला ट्रस्ट कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना काही सूचना करत पारंपरिक यात्रा करण्यास परवानगी दिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य जोतिबा थोरवत, पंच कमिटी अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, शिपय्या बुर्लकुट्टी, बसवंत पवार, हनुमंत नावगेकर, गुरूदास लोखंडे, महादेव चव्हाण, बुद्धाजी इंगळे, सिद्दाप्पा पवार, नारायण नरवाडे, रूक्माण्णा हावळ, नानाजी लोखंडे, पुजारी शिवानंद मठपती यासह इतर उपस्थित होते.
असा होणार यात्रोत्सव
पहाटे 6 वा. राजहंसगडावर पालखी सेवा, दुपारी 3 वा. लहान मुलांचा तुलाभार व नामकरण सोहळा, दुपारी 4 वा. मंदिर परिसरात बैलजोड्या फिरविणे कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 वा. नारळ उडविण्याचा विधी व 6 वा. महाआरती व राजहंसगड गावामध्ये अंबिल गाड्यांची मिरवणूक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी, किल्ला ट्रस्ट कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने केले आहे.









