प्रतिनिधी/ बेंगळूर
येथील आलिशान हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपावरून रविवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सिद्धांत कपूरसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना मंगळवारी जामीन देण्यात आला आहे. सिद्धांत कपूर या पार्टीमध्ये डीजे ऑपरेटर म्हणून सहभागी झाला होता.
बेंगळूरच्या एम. जी. रोडवरील ‘द पार्क’ हॉटेलवरील छाप्यावेळी पार्टीत सहभागी झालेल्यांना ताब्यात घेऊन रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यामध्ये सिद्धांत कपूरसह पाच जणांना हलसूर पोलीस स्थानकात नेऊन अटक करण्यात आली होती. चौकशीनंतर पाचही जणांना पोलिसांनी ऑन टेबल हमीपत्र घेऊन जामीनावर (स्टेशन बेल) सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती बेंगळूर पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली आहे.
ड्रग्ज पेडलिंग न केल्याने सिद्धांत, अखील सोनी, हरज्योत सिंग, अखील अनी आणि दर्शन सुरेश यांना जामीनावर सोडण्यात आले आहे. चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्यानंतर हजर रहावे, तसेच चौकशीसाठी सहकार्य करावे, अशा अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. पार्टीमध्ये पोलीस छाप्यावेळी ड्रग्ज गायब करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेण्यात येईल. पार्टी झालेल्या हॉटेललाही नोटीस बजावण्यात आली आहे, असे डीसीपी गुळेद यांनी सांगितले.
चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य
चौकशीसाठी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य केले आहे. ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. यापुढेही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास हजर होईन, अशी प्रतिक्रिया अभिनेता सिद्धांत कपूर याने जामीनावर सुटका झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.









