मंत्री एम. बी. पाटील यांना विश्वास
बेळगाव : बेंगळूर शहराबरोबर बेळगाव-हुबळी दरम्यान स्टार्टअप सुरू केले जाणार आहे. याबाबतची 50 टक्के तयारी पूर्ण झाली आहे. तसेच बेळगाव-खानापूर-गोवा हायवेवरही स्टार्टअप यशस्वी होईल, अशी माहिती अवजड व मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. शुक्रवारी ते एका खासगी कार्यक्रमासाठी बेळगावात आले असताना जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिवाय 888 एकर जमीनही निश्चित झाली आहे.
मात्र काही कारणास्तव काम प्रलंबित आहे. मात्र, 2027 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतर केल्याच्या आरोपात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात चौकशीला परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेतही आपल्या बाजूनेच निकाल लागेल, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला. सिद्धरामय्या पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री असतील. भाजपच्या आरोपात काहीही तथ्य नाही. शिवाय काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल, त्याला आम्ही बांधिल आहोत. भाजप राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कटकारस्थान आखत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
‘त्या’ कामगाराच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईबाबत लवकरच कार्यवाही
नावगे क्रॉस येथे कारखान्याला आग लागून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याची कार्यवाही लवकर केली जाईल.









