असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून अहवाल प्रसिद्ध : सिद्धरामय्यांची 51 कोटी संपत्ती
मालमत्ता…
- देशातील 30 मुख्यमंत्र्यांकडे एकूण 1,600 कोटींची मालमत्ता
- चंद्राबाबू नायडू 931 कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर
- प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे केवळ 15.38 लाख मालमत्ता
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशातील 30 मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली असून 30 मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता 1,632 कोटी रुपये आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू 931 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू 332 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सिद्धरामय्या 51 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
देशातील 30 मुख्यमंत्र्यांकडे (राष्ट्रपती राजवटीमुळे मणिपूर वगळण्यात आले आहे) एकूण 1,600 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे 30 मुख्यमंत्र्यांच्या एकूण मालमत्तेपैकी निम्म्याहून अधिक मालमत्ता आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एकूण 51 कोटी मालमत्तेपैकी एकूण 21 कोटी रुपये जंगम मालमत्ता तर 30 कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे 30 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत. तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा (1.46 कोटी रुपये), उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ (1.54 कोटी रुपये), बिहारचे नितीश कुमार (1.64 कोटी रुपये), पंजाबचे भगवंत मान (1.97 कोटी रुपये), ओडिशाचे मोहन चरण मांझी (1.97 कोटी रुपये) आणि छत्तीसगडचे विष्णू देव साई (3.80 कोटी रुपये) हे सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत.
तीन मुख्यमंत्र्यांकडे सर्वात कमी संपत्ती
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मालमत्ता 1.18 कोटी रुपये, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता 55.24 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता 15.38 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हे सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांची एकूण घोषित मालमत्ता 15.38 लाख आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
11 मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटींपेक्षा जास्त कर्ज जाहीर
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील सर्वात कमी मालमत्ता असलेल्यांच्या यादीत आहेत. त्यांच्याकडे एकूण 55.24 लाख जंगम मालमत्ता आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मालमत्ता 1.18 कोटी आहे. 11 मुख्यमंत्र्यांनी 1 कोटींपेक्षा जास्त कर्ज जाहीर केले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या नावावर 180 कोटींचे कर्ज आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर 23 कोटींचे कर्ज तर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 10 कोटींपेक्षा जास्त कर्ज जाहीर केले आहे.









