वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ईडीच्या समन्सवर आक्षेप घेत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पीएमएलएच्या तरतुदींच्या होणाऱ्या गैरवापरावरून न्यायालयांनी जागं होण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणा जवळपास सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. ईडी आणि नेत्यांना जामीन देण्यास नकार देणे सरकारच्या हातातील ‘राजकीय अस्त्र’ ठरले असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए अंतर्गत समन्स बजावण्यातआला असून अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने इंडिया आघाडीने एक सुरात आवाज उठविण्याची गरज असल्याचे सिब्बल म्हणाले. कपिल सिब्बल हे संपुआच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळादरम्यान केंद्रीय मंत्री होते. सिब्बल यांनी मागील वर्षी काँग्रेसला रामराम ठोकला होता. सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. समाजवादी पक्षाच्या समर्थनाने ते अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून आले आहेत.









