‘खास’ सियाची संघर्षमय खास यशोगाथा : बालपणीच हरपले होते पालकांचे छत्र,मामा–मामी ठरले सियासाठी देवदूत
प्रतिनिधी /महेश कोनेकर
घरात दोन मुलींचा जन्म झाल्यावर वडिलांनी घर सोडले. त्यानंतर आईचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन मुलींच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरवले. या दोन मुली जवळपास अनाथ झाल्या. अशा परिस्थितीत या दोन मुलींच्या मामा-मामींने पुढे येऊन त्यांची जबाबदारी स्वीकारली. त्यातील एका मुलीने आता जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिकमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णमय कामगिरी बजावताना भारताला दोन सुवर्ण व एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके मिळवून दिली आहेत. ही कहाणी आहे भाटी-सांगे येथील सिया सरोदे हिची. सिया सरोदेने बुधवारी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके भारतीय संघाला प्राप्त करून दिली. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र, तिच्या आयुष्याचा प्रवास हा अत्यंत खडतर असाच आहे.
देवदूत मामा-मामी
सांगे तालुक्यातील अत्यंत ग्रामीण अशा भाटी गावात जन्म झालेल्या सियाच्या वडिलांनी घरात दोन मुलीचा जन्म झाल्यानंतर घरच सोडले. ते कुठे गेले, कुठे आहेत यांचा थांगपत्ता कुणालाही नाही. वडिलांनी घर सोडल्यानंतर या दोन मुलीची जबाबदारी आईवर आली. पण, आईने देखील या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सिया व तिची बहीण सुप्रिया या दोघी अनाथ झाल्या. पण, त्यांचे मामा-मामी सुभाष व प्रमिला नाईक हे देवदूताप्रमाणे पुढे आले व त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली.
आवडीच्या पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रशिक्षण
सुप्रिया ही आज नर्स म्हणून कार्यरत आहे. सिया ही विशेष मुलांच्या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. सिया जरी विशेष मुलांच्या वर्गात मोडत असली तरी तिला खेळाची आवड आहे. तिची आवड लक्षात घेऊन तिला पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. बर्लिन स्पेशल ऑलिंपिकची तयारी करताना तिला राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून सुरुवातीचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर तिच्याकडून दररोज सराव करून घेण्यात गौतमी सावंत देसाई हिने महत्त्वाची भूमिका बजावली.
तीन वेळा नाकारला व्हिसा
जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिकसाठी भारतीय पथक पाठविण्यासाठी तयारी सुरू झाली, तेव्हा सिया सरोदे वगळता इतर खेळांडूना व्हिसा मिळाला आणि ते जर्मनीकडे रवाना झाले. सियाला पालक नसल्याने तीन वेळा जर्मनीचा व्हिसा नाकारण्यात आला. त्यामुळे ती दिल्लीत अडकून पडली. अशावेळी सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे तिच्या मदतीला धावले. त्यांनी सियाच्या व्हिसाचा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यास सांगितले. त्याचबरोबर जर्मनीत भारतीय दूतावासाकडे संपर्क साधून व्हिसा मिळवून दिला.
चार पदाकांवर कोरले आपले नाव
व्हिसा वेळीच न मिळाल्याने सिया बर्लिनमध्ये स्पेशल ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभाला पोहचू शकली नाही. ती ज्या पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात भाग घेणार होती, तिच्या एक दिवस अगोदर ती बर्लिनमध्ये पोचली. पॉवरलिफ्टिंगची तयारी करण्यासाठी तिच्या हातात पुरेसा वेळ नसतानादेखील तिने पॉवरलिफ्टिंगमधील ‘डॅड लिफ्ट’ आणि ‘स्क्वॅट’ प्रकारात सुवर्ण, तर कंबाईंड प्रकारात रौप्य आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्य अशा एकूण चार पदकांवर आपले नाव कोरले. तिच्या सुवर्णमय कामगिरीने देशाला तसेच गोव्याला नावलौकीक मिळवून दिला.
गोव्यातील खेळांडूसमोर अनेक अडचडणी हायस्कूलचा आर्थिक मदत करण्यास नकार
बर्लिनमध्ये गेलेल्या भारतीय संघात गोव्यातील 23 खेळांडूचा समावेश आहे. या सर्व खेळांडूमध्ये गोव्यातील विशेष मुलांच्या हायस्कूलमधील विद्यार्थांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना दररोजचा खर्च म्हणून हायस्कूलने दोन लाख ऊपये मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. पण, हायस्कूलच्या लेखा अधिकाऱ्याने असे पैसे देण्याची तरतूद नसल्याचे कारण पुढे करून आर्थिक मदत नाकारली.
क्रीडा खात्यानेही दिली नाही मदत
त्यानंतर आर्थिक मदतीसाठी सरकारच्या क्रीडा खात्याकडे संपर्क साधण्यात आला. पण, क्रीडा खात्यानेही आर्थिक मदत दिली नाही. त्यामुळे खेळांडूसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. अशावेळी भारतीय स्पेशल ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकारी श्रीमती मल्लिका न•ा तसेच गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतरांनी पदरमोड करून भारतीय विशेष ऑलिंपिक संघासाठी सुमारे 20 लाख ऊपयांचा निधी गोळा करुन दिला. गोव्यातील खेळांडूना बर्लिनमध्ये सुरूवातीला भारतीय पद्धतीचे जेवण मिळणे कठीण झाल्याने आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे खेळांडूच्या मैदानी कामगिरीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. खेळांडूना भारतीय पद्धतीचे जेवण मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली. तसे एक रेस्टॉरंट उपलब्ध झाले. मात्र, जेवण महाग असल्याची माहिती हाती आली आहे. एका व्यक्तीच्या एका जेवणावरच जवळपास एक हजार ऊपये खर्च येत असतो. जेवण महाग असले तरी गोव्यातील खेळांडूना एकवेळचे जेवण तेही चांगल्या पद्धतीचे मिळणार याची सध्या व्यवस्था करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी कोट्यावधींचा खर्च… पण?
गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर सरकार सुमारे 600 कोटी ऊपये खर्च करणार आहे. सध्या स्पर्धेचा शुभंकर ‘मोगा’चे मोठे जाहिरात फलक सर्वत्र पहावयास मिळत आहेत. त्यावर लाखो ऊपये खर्च केले जात आहेत. पण, बर्लिनमध्ये जाणाऱ्या स्पेशल ऑलिंपिकमधील खेळांडूसाठी आर्थिक मिळू शकली नाही. त्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. सरकार विशेष खेळांडूकडे किती गांभीर्याने पाहत आहे ?असा सवालही उपस्थित झालेला आहे.
गोवा सरकार मदत देणार की नाही?
भारतीय संघाला पदक मिळवून दिलेल्या इतर राज्यांतील खेळांडूना त्या त्या राज्यांतील सरकारने भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, गोवा सरकारने अद्याप कोणतीच घोषणा केलेली नाही. गोव्याच्या खेळांडूनी बर्लिन ऑलिंपिकमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांना सरकार आर्थिक मदतची घोषणा करणार की नाही, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.









