कोल्हापूर :
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू झाली. विमानांच्या प्रत्येक फेरीला ही बस धावणार आहे.
कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिलकुमार शिंदे आणि विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य तेज घाटगे यांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर टर्मिनल इमारतीला एक वर्ष पूर्ण झाले. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाला तीस वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून, ही बस सेवा सुरू केली. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना विमानतळ ते शहरामध्ये येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक प्रवाशाकडून या ठिकाणाहून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेऊन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी स्वखर्चाने ही बस सेवा सुरू केली. कोल्हापूर विमानतळ ते सयाजी हॉटेल या मार्गावर ही वाहतूक सेवा विमानाच्या वेळेत दररोज सुरू राहणार आहे. विमानतळाहून अन्य ठिकाणी जाणाऱ्या विमानांच्या वेळेपूर्वी सयाजी हॉटेल येथून ही बस विमानतळाकडे मार्गस्थ होईल.
- खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रयत्नातून बसची सुविधा
कोल्हापूर विमानतळावरुन शहरात जाण्यासाठी शटल बस सेवा सुरु करावी, यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला, पण महापालिकेकडे अद्याप इलेक्ट्रिक बस उपलब्ध नसल्याने बससेवा सुरु झाली नव्हती. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मोफत शटल बस सेवा सुरु केली आहे. प्रवाशांना या बससेवेचा लाभ होईल.
–अनिलकुमार शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ








