अस्थायी फंडिंग विधेयक संमत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत शटडाउनचा धोका तूर्तास टळला आहे. 1 ऑक्टोबरपूर्वी सिनेटमध्ये फंडिंग विधेयक संमत झाल्याने अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसने एजेन्सींचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी एका अस्थायी फंडिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे. तसेच त्याला कायद्याचे स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी अध्यक्ष बिडेन यांच्याकडे पाठविले आहे.
हे फंडिंग विधेयक अत्यंत घाईत संमत करण्यात आले आहे. यात युक्रेनला देण्यात येणारे सहाय्य कमी करण्यात आले आहे, कारण जीओपी खासदारांच्या वाढत्या संख्येने याला विरोध केला होता. तर संघीय आपत्ती निधीत 16 अब्ज डॉलर्सची वृद्धी करण्यात आली आहे. या विधेयकाला 45 दिवसांसाठी सिनेटकडुन मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 17 नोव्हेंबरपर्यंत शटडाउनचा धोका टळला आहे.
हे विधेयक संमत झाल्याने अमेरिकेच्या जनतेला दिलासा मिळाला आहे. अमेरिका कुठल्याही स्थितीत युक्रेनसाठी समर्थन रोखू देणार नाही. सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी हे युक्रेनच्या जनतेबद्दलची स्वत:ची प्रतिबद्धता कायम ठेवतील आणि या महत्त्वाच्या क्षणी युक्रेनला मदत करण्यासाठी आवश्यक समर्थन देतील अशी अपेक्षा असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत सध्या शटडाउनचा धोका टळला असला तरीही हा दिलासा काही दिवसांसाठीच आहे. आगामी आठवड्यांमध्ये काँग्रेसकडून वाढीव निधीची मंजुरी घेणे प्रशासनाला भाग पडणार आहे. 1 ऑक्टोबरपूर्वी फंडिंग विधेयक संमत झाले नसते तर संघीय कर्मचाऱ्यांना सुटीवर जावे लागले असते आणि राखीव सैनिकांना विनावेतन काम करावे लागले असते.









