वृत्तसंस्था/ क्वेटा
भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये जेन झेड आंदोलनामुळे हिंसा सुरू आहे. याचदरम्यान आणखी एक शेजारी देश पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात बंद पुकारण्यात आला आहे. बलुचिस्तानच्या अनेक राजकीय पक्षांनी बुधवारी शटडाउनची घोषणा केली असून याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. बलुचिस्तानातील सर्व मोठ्या शहरांच्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला आणि बाजारपेठा बंद राहिल्या. झोबपासून ग्वादारपर्यंत सर्व मोठ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिली.
पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी छाप्यांची कारवाई करत छळ चालवल्याने बलुचिस्तानात संताप पसरला आहे. सुरक्षा दलांनी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक केल्याने हा संताप अधिकच भडकला आहे. बलुचिस्तानातील अत्याचार वाढवत पाकिस्तानच्या प्रशासनाने सुमारे 100 जणांना ताब्यात घेतले आहे. बलुचिस्तान नॅशनल पार्टी, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ, अवामी नॅशनल पार्टी, नॅशनल पार्टी, जमात-ए-इस्लामी समवेत अनेक पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
क्वेटासह अनेक शहरांमधून नेत्यांना अटक करण्यात आली आहे. सुराब येथून बलुचिस्तान नॅशनलिस्ट पार्टीच्या तीन नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. मास्तंग येथून बीएनपी आणि नॅशनल पार्टीच्या 14 सदस्यांची धरपकड करण्यात आली आहे. याचबरोबर लोरालाई येथून सुरक्षा दलांनी 7 नेत्यांना पकडले आहे.
पोलिसांनी शेकडो लोकांना अटक केली असून यात अनेक वरिष्ठ नेते सामील असल्याचा आरोप अवामी नॅशनल पार्टीने केला आहे. बलुचिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका यशस्वी शटडाउन झाल्याचा दावा अवामी नॅशनल पार्टीने केला आहे. सरकारच्या बंधनांच्या विरोधात जनता किती आक्रमक आहे हे या यशस्वी बंदमधून स्पष्ट होते असे आंदोलक नेत्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान सरकारची कारवाई लोकशाही आणि मानवाधिकारावरील हल्ला आहे. सरकार लोकांना दहशतवादापासून वाचविण्यास अपयशी ठरले आहे, उलट लोकांवरच पाकिस्तान सरकारकडून अत्याचार केले जात आहेत असे बलोच यकजेती कमिटीचे म्हणणे आहे.









