वनखात्याच्या बंदी आदेशाचा परिणाम : धोका नसलेल्या धबधब्यावर जाण्यास मुभा
प्रतिनिधी / वाळपई
धबधब्याच्या ठिकाणी प्राणहानीच्या घटना घडू लागल्यामुळे वनखात्याने धबधब्याच्या परिसरामध्ये बंदी घालण्याचा आदेश जारी केला. याची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश वनखात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गजबजलेले धबधब्यांच्या परिसरात सामसूम असल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, खात्याने आपल्या आदेशामध्ये किंचित बदल करताना ज्या धोका नसलेल्या धबधब्याच्या परिसरात जाण्याची मुभा दिली आहे. यामुळे रविवारी किंवा पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा सत्तरी तालुक्यातील काही धबधब्यावर गर्दी होण्याची शक्यता आहे. मंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या आदेशाची कडकपणे अंमलबजावणी सुरू आहे. वाळपई पोलिसांकडून अनेक ठिकाणी पथक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे वन खात्याची यंत्रणा व अबकारी खात्याचे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र धबधब्याच्या परिसरामध्ये कोणीही फिरकला नाही. त्यामुळे धबधब्याच्या परिसरामध्ये सामसून पसरली होती.
सुरक्षित धबधब्यांवर जाण्याची मुभा
दरम्यान, शनिवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार, सत्तरी तालुक्यातील ज्या धबधब्याच्या परिसरामध्ये धोका नाही त्या ठिकाणी पर्यटकांना व नागरिकांना जाण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. साटरे, कोदाळ भागातील धबधब्यावर नदी पार करून जावे लागते. त्याचप्रमाणे धबधबा परिसरामध्ये खोल भाग आहे. सदर ठिकाणी पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्या ठिकाणी मात्र पर्यटकांना जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. तर पाली, हिवरे, चरावणे, सालेली, शेळप या भागातील धबधब्याच्या परिसरात जाण्यासाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. रविवारी येथे गर्दी होण्याची शक्यता आहे.
वाळपई बाजारपेठेवर परिणाम
गेल्या शनिवारी व रविवारी सत्तरीतील धबधब्यांवर जाण्यासाठी आलेल्या गाड्यांमुळे वाळपईच्या बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली होती. आज मात्र वाळपई शहरातही वातावरण सामसूम पाहावयास मिळाली. ज्या ठिकाणी रस्ते वाहनाने पूर्णपणे भरला होता तो रस्ता आज मात्र मोकळा दिसत होता.
यूथ होस्टेलच्या शिबिरार्थींकडून साफसफाई
दरम्यान, यूथ हॉस्टेल ऑफ इंडिया यांच्यातर्फे ठाणे येथे मान्सून शिबिर सुरू आहे. वनखात्याने धबधब्याच्या परिसरात बंदी घालण्यात आल्यानंतर आज यूथ हॉस्टेल ऑफ इंडियाच्या शिबिरार्थिकडून चरावणे, हिवरे आदी भागांमध्ये धबधब्याच्या परिसरामध्ये साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली. यातून मोठ्या प्रमाणात कचरा, खाली दारूच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या असा कचरा गोळा करण्यात आलेला आहे. महादई अभयारण्याचे परिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलूडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की यूथ हॉस्टेलच्या शिबिरार्थिंनी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला असून धबधबा परिसर पूर्णपणे साफ करण्यात आलेला आहे.
आज कुठल्याही धबधब्यावर पर्यटक किंवा नागरिकांची उपस्थिती नव्हती. वनखात्याच्या बंदी आदेशाचे कडकपणे पालन करताना ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्या नसल्याचे वाळपईचे पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले.









