दुलीप ट्रॉफीसाठी संघ जाहीर
वृत्तसंस्था/लीड्स
इंग्लंड दौऱ्यात कॅप्टन्सीत चमकलेल्या शुभमन गिलवर बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील प्रतिष्ठित स्पर्धेत नवी जबाबदारी दिली आहे. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत तो उत्तर विभागाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दुलीप करंडक स्पर्धा ही 28 ऑगस्टपासून सुरु होत आहे. 4 सप्टेंबरला या स्पर्धेतील दोन्ही सेमी फायनल खेळवण्यात येणार असून 11 सप्टेंबरला फायनल नियोजित आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-20 संघाची निवड अपेक्षित आहे. गिल हा 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने निवड समिती त्याला टी-20 पासून दूर ठेवत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळवण्यावर भर देणार की, आयत्यावेळी त्याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड होणार ते पाहण्याजोगे असेल. दुसरीकडे, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगचाही उत्तर विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, अंशुल कंबोज, हर्षित राणा यांचीही संघात वर्णी लागली आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ – शुभमन गिल (कर्णधार), शुभम खजूरिया, अंकित कुमार, आयुष बडोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत सिंधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंह चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, कन्हया वधावन.









