आयसीसीकडून घोषणा : पुरुष गटात चारवेळा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू
वृत्तसंस्था/दुबई
जुलै महिन्याच्या आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड मालिकेत त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो पुरुष गटात चार वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. इंग्लंडमध्ये गिलने फलंदाजी करताना स्वप्नवत कामगिरी केली. जुलैमध्ये खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यात 94.50 च्या सरासरीने 567 धावा केल्या. त्याने यापूर्वी जानेवारी 2023, सप्टेंबर 2023 आणि फेब्रुवारी 2025 मध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता. अॅश गार्डनर आणि हेली मॅथ्यूज या दोन महिला खेळाडूंनी प्रत्येकी चारवेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या कालावधीत बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीत केलेल्या 430 धावा गिलसाठी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ते कसोटी सामन्यातील आतापर्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत. त्या कसोटीत त्याने 269 आणि 161 धावांची बरसात केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना शुभमन गिल म्हणाला की, आपण पुढील हंगामातही चांगली कामगिरी सुरू ठेवण्याची आशा बाळगतो. जुलैसाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड होणे खूप छान वाटत आहे. यावेळी ते खूप महत्त्वाचे आहे. कारण कर्णधार म्हणून माझ्या पहिल्या कसोटी मालिकेतील कामगिरीमुळे हे घडले आहे. बर्मिंगहॅममधील द्विशतक हे निश्चितच मी कायमचे जपून ठेवेन आणि माझ्या इंग्लंड दौऱ्यातील एक ठळक वैशिष्ट्या असेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. इंग्लंडविऊद्धची कसोटी मालिका कर्णधार म्हणून माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता आणि दोन्ही संघांकडून काही उत्कृष्ट कामगिरी झाली. दोन्ही संघांचे खेळाडू दीर्घकाळ लक्षात ठेवतील, याची मला खात्री आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी ज्युरीचे आणि या रोमांचक मालिकेदरम्यान माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. मी पुढील हंगामात माझी कामगिरी सुरू ठेवण्याची आणि देशासाठी अधिक गौरव आणण्याची अपेक्षा करतो, असेही तो म्हणाला.
सोफिया डंकली सर्वोत्तम महिला खेळाडू
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकलीने आपल्या संघातील सहकारी सोफी एक्लेस्टोन आणि आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस यांना मागे टाकत आयसीसीची महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला. या काळात एकदिवसीय तसेच टी-20 मध्येही डंकलीने चांगली कामगिरी केली. तिने भारताविऊद्धच्या घरच्या मैदानावर झालेले सातही सामने खेळले. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 126 धावा आणि चार टी-20 सामन्यांमध्ये 134.57 च्या स्ट्राईक-रेटने 144 धावा केल्या. डंकलीने टी-20 मालिकेत इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमविल्या. तिने साउथहॅम्प्टनमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 92 चेंडूत 83 धावा केल्या. भारताविऊद्धच्या खरोखरच कठीण मालिकेनंतर आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकल्याबद्दल मला आनंद होत आहे, असे डंकली म्हणाली. आम्हाला मालिका जिंकायला आवडले असते. परंतु मला वाटते की आयसीसी महिला विश्वचषकाकडे जाताना आम्ही त्यातून बरेच काही घेऊ. भारत त्यांच्या विजयास पात्र होता आणि त्याचा भाग असणे ही एक उत्तम मालिका होती, असेही तिने स्पष्ट केले.









