वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड वनडे क्रिकेट प्रकारात केली जाते. विविध देशांच्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेऊनच या पुरस्कारासाठी क्रिकेटपटूची निवड करण्यात येते. दरम्यान, भारताचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिल याची जानेवारी महिन्यातील आयसीसीच्या वनडे क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात इंग्लंडच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या संघाची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हेन्सची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली.
जानेवारीच्या कालावधीत भारताच्या शुबमन गिलने वनडे क्रिकेट प्रकारात दमदार फलंदाजी करत लंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत 567 धावा जमविताना 3 शतके झळकविली. 23 वर्षीय गिलने आपल्या आक्रमक फटकेबाजीने शौकिनांना या मालिकेत खूष केले. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेतील हैद्राबादच्या पहिल्या सामन्यात गिलने नाबाद 208 धावा झोडपताना 149 चेंडूत 28 चौकार ठोकले. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकाविणारा गिल हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे. त्यानंतर गिलने लंकेविरुद्धच्या सामन्यात 116 तर न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 112 धावा झळकविल्या होत्या. जानेवारी महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारच्या शर्यतीमध्ये शुबमन गिल, न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज देवॉन कॉन्वे आणि भारताचा वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात चुरस झाली. पण गिलने त्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला.
महिलांच्या विभागात इंग्लंडच्या 19 वर्षीय वयोगटातील संघाची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हेन्स हिची या पुरस्कारासाठी आयसीसीने निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेत अलिकडेच झालेल्या महिलांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्क्रिव्हेन्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीचे शानदार दर्शन घडवीत इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. पण अंतिम सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्कारावा लागला होता. स्क्रिव्हेन्सने 41.85 धावांच्या सरासरीने 293 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तिने या स्पर्धेत गोलंदाजी करताना 7.11 धावांच्या सरासरीने 9 गडी बाद केले आहेत. महिलांच्या विभागात या पुरस्कारासाठी इंग्लंडची लिचफिल्ड आणि ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी यांची शिफारस करण्यात आली होती. पण स्क्रिव्हेन्सने या दोन्ही खेळाडूंना मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला. आयसीसीच्या हॉल ऑफ फेमचे क्रिकेटपटू तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि आयसीसीच्या वेबसाईटवर अधिकृत नोंद झालेल्या क्रिकेट शौकिनांच्या मतदानातून हा पुरस्कार जाहीर केला जातो.









