बेळगाव : ग्राम पंचायत पीडीओला जाब विचारणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्यासह सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याने समिती नेते शुभम शेळके यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यासाठी विशेष अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. बुधवारी सदर अर्जावर सुनावणी होऊन शुभम शेळके यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. त्यांची सायंकाळी कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यामुळे कारागृहाबाहेर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
किणये ग्राम पंचायत पीडीओला मराठी येत नसल्यावरून एका तरुणाने जाब विचारला होता. मात्र, पोलिसांनी सदर तरुणावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे समिती नेते शुभम शेळके यांनी पीडीओला जाब विचारणाऱ्या तरुणाचा सत्कार केला होता. त्याचबरोबर सोशल मीडियावर प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. मात्र, पोलिसांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रियेला आक्षेप घेत शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
शेळके यांच्या जामिनासाठी वकिलांनी मंगळवारी विशेष अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी पाच लाखांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा जामीनदार, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये या अटींवर पोलीस उपायुक्तांनी जामीन मंजूर केला. शेळके यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. रिचमन रिकी यांनी काम पाहिले.









