वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय बुचीबाबु करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी तिसऱ्या दिवशी अखेर जम्मू-काश्मिर संघाकडून खेळणाऱ्या शुभम खजुरीयाने शानदार द्विशतक झळकविले. शुभमच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मिरने छत्तीसगडवर भक्कम आघाडी मिळविली आहे. या स्पर्धेतील अन्य सामन्यामध्ये झारखंड आणि रेल्वे हे संघ विजयाच्या मार्गावर आहेत.
छत्तीसगड आणि जम्मू-काश्मिर यांच्यातील समान्यात छत्तीसगडचा पहिला डाव 278 धावांवर आटोपला. त्यानंतर जम्मू-काश्मिरने आपला पहिला डाव 9 बाद 587 धावांवर घोषित करुन 309 धावांची भक्कम आघाडी मिळविली. शुभम खजुरीयाने 8 षटकार आणि 17 चौकारांसह 202 धावा झोडपल्या. जम्मू-काश्मिर संघातील साहील लोत्राने 107, पारस डोगराने 73 तर अब्दुल समादने 58 धावा झळकविल्या. दिवस अखेर छत्तीसगडने दुसऱ्या डावात 2 बाद 46 धावा जमविल्या होत्या.
मध्यप्रदेश आणि झारखंड यांच्यातील समान्यात मध्यप्रदेशचा पहिला डाव 225 धावांवर आटोपला. त्यानंतर झारखंडने पहिल्या डावात 289 धावा जमविल्या. झारखंडने मध्यप्रदेशवर 64 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर मध्यप्रदेशचा दुसरा डाव 225 धावांवर संपुष्टात आला. झारखंडला आता विजयासाठी 161 धावांची जरुरी आहे. रेल्वे आणि गुजरात यांच्यातील सामन्यात रेल्वेचा पहिला डाव 570 धावांवर आटोपला. त्यानंतर गुजरातने पहिल्या डावात 227 धावा जमविल्या. रेल्वेने 343 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी आपला दुसरा डाव 5 बाद 135 धावांवर घोषित करुन गुजरातला निर्णायक विजयासाठ 479 धावांचे आव्हान दिले. गुजरातने दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 91 धावा जमविल्या. हरियाणा आणि मुंबई यांच्यातील सामन्यात हरियाणाने पहिल्या डावात 419 धावा जमविल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 245 धावांत आटोपल्याने हरियाणाने 174 धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर हरियाणाने दुसऱ्या डावात 2 बाद 83 धावा जमविल्या होत्या.









