वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथील डीवाय पाटील स्टेडियमवर शनिवारी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळताना भारतीय संघातील फलंदाज शुभा सतीश हिच्या बोटाला दुखापत झाली असून ती आता आगामी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघातील हा एकमेव कसोटी सामना 21 ते 24 डिसेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय महिला संघाने शनिवारी येथे झालेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडचा 347 धावांच्या विक्रमी फरकाने दणदणीत पराभव केला.
शुभा सतीशच्या बोटाचे हाड मोडल्याने ती भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकली नाही. 24 वर्षीय शुभाच्या या बोटावर प्लॉस्टर घालण्यात आले असून तिला ही दुखापत बरी होण्यासाठी कांही कालावधी लागेल असे सांगण्यात आले. या कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात शुभा सतीशने 76 चेंडूत 13 चौकारांसह 69 धावांची खेळी केली होती. महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात अर्धशतक झळकविणारी शुभा सतीश ही भारताची बारावी महिला क्रिकेटपटू आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आतापर्यंत मायदेशात झालेल्या 15 कसोटीतील हा पहिला विजय आहे. भारतीय महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय म्हणून नोंदला गेला आहे. यापूर्वी म्हणजे 1998 एप्रिल महिन्यात लंकन महिला क्रिकेट संघाने पाकचा कसोटी सामन्यात 309 धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने ही कसोटी खेळाच्या एक दिवस बाकी ठेऊनच जिंकली. गेल्या 9 वर्षांच्या कालावधीतील मायदेशात भारतीय महिला संघाने ही पहिली कसोटी जिंकली आहे. गेल्या 2 वर्षांत भारतीय महिला संघाने एकही कसोटी सामना खेळला नव्हता.









