विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रांपेक्षा अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची प्रगती सरस आहे. भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने भारताला या क्षेत्रात जागतिक मानाचे स्थान निश्चितच मिळवून दिले आहे. चंद्राच्या आजवर कोणालाही न दिसलेल्या गोलार्धावर अवकाश वाहन उतरविण्याची कामगिरी करणारा भारत हा जगातील प्रथम देश म्हणून नुकताच ख्यातीप्राप्त झाला आहे. तसेच सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही भारताने यशस्वीरित्या सौरयान पाठविले आहे. आता अंतराळ स्थानकात वास्तव्य करु शकेल, असा अंतराळवीरही भारताने घडविला आहे. शुभांशू शुक्ला या इस्रोशी संबंधित अंतराळवीराने अमेरिका आणि रशिया यांनी संयुक्तरित्या निर्माण केलेल्या अंतराळ संशोधन केंद्रात वास्तव्य केले आणि तो मंगळवारी त्याच्या अन्य सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरुप परतला. या अंतराळ अभियानात भारताने जवळपास साडेपाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मानवसहित अंतराळ यान अवकाशात पाठविण्याची आणि ते परत आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना इस्रो 2027 मध्ये हाती घेणार असून या योजनेचा एक भाग म्हणून शुभांशू शुक्ला याच्या अंतराळ स्थानक वास्तव्याकडे पाहिले जात आहे. अलीकडच्या काळात अंतराळ प्रवास, अंतराळ स्थानकात वास्तव्य आणि तेथून परत येणे हे विशेष अवघड किंवा दुर्मिळ राहिलेले नाही. असे असले तरी, शुभांशू शुक्ला आणि त्याच्या माध्यमातून इस्रो यांची ही कामगिरी कौतुकास्पदच आहे. कारण अंतराळात मानव पाठविण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. ही महत्त्वाकांक्षा साध्य झाल्यास भारत स्वतंत्ररित्या आणि स्वबळावर अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी हे साध्य केले आहे. त्यामुळे या संदर्भात भारत एक ‘महाशक्ती’ म्हणून गणला जाईल हे निश्चित आहे. स्वत: शुभांशू शुक्लाही भारताच्या या ‘गगनयान’ अभियानात सहभाग घेणार आहे. त्यामुळे यावेळी त्याने मिळविलेला अनुभव त्याला आणि भारताला ‘गगनयान’ अभियानात उपयोगी पडेल. भविष्यकाळासाठी भारताने अवकाश संशोधनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना मनाशी ठरविल्या असून त्यांना बळ देणारी कामगिरी शुभांशू शुक्ला याने केली आहे. अशा प्रकारे भारताचा अवकाश कार्यक्रम पुढे झेपावत असताना, अशा कार्यक्रमांना आक्षेप घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. भारतासारख्या ‘गरीब’ देशाने अवकाश संशोधनासारख्या प्रचंड खर्चाच्या आणि त्यामानाने लाभदायक नसलेल्या योजना कशाला हाती घ्याव्यात? हाच पैसा गरीबांवर खर्च का करु नये? एवढी गुंतवणूक करुनही भारत आज अमेरिका, रशिया, चीन आदी देशांपेक्षा या क्षेत्रात मागेच आहे ना? मग अवकाश संशोधनाचा एवढा ध्यास कशासाठी? इत्यादी अनेक नकारात्मक प्रश्न अनेकांना केवळ त्यांच्या अज्ञानापोटी पडत असतात. गरिबी दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत यावर कोणाचेही दुमत नाही. यासाठी शक्य तितका खर्चही करण्याचे उत्तरदायित्वही सरकारचे असते, हे निर्विवाद आहे. तथापि, भारताचा अंतराळ संशोधनाचा खर्च त्याच्या एकंदर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक दशांश टक्काही नाही. त्यामुळे तेव्हढा पैसाही खर्च करु नये, असे म्हणणे, हे ‘दात कोरुन पोट भरण्या’सारखे निरर्थक आहे. अंतराळ संशोधन आणि अंतराळाचा उपयोग अर्थव्यवस्था प्रगत करण्यासाठी करणे ही आजच्या युगात एक महत्वाची बाब मानली गेली आहे. आजचे युग हे संपर्क युग आहे. अत्याधुनिक संपर्क तसेच दूरसंचार तंत्रज्ञान ज्या देशाकडे असेल तो जगाला भारी ठरु शकतो, अशी स्थिती आहे. दूरसंचाराची, अर्थात टेलिफोन्स, मोबाईल फोन्स, इंटरनेट आणि इतर साधनांची व्यवस्था अंतराळात सोडलेल्या उपग्रहांवर अवलंबून आहे. या संदर्भात आपण विदेशी उपग्रहांवर अवलंबून राहू शकत नाही. कारण, तसे केल्यास आपले दूरसंचार क्षेत्रातील स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते. ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अडचणीची ठरु शकते. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होणे ही आपली महत्त्वाची आवश्यकता आहे. अवकाश संशोधन कार्यक्रमाला प्राधान्य दिल्याशिवाय आपण हे साध्य करु शकत नाही. अवकाश संशोधन म्हणजे केवळ चंद्रावर यान पाठविणे किंवा मानवाला अंतराळ प्रवास घडविणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेचीही वाढ आणि प्रगती अंतराळ संशोधनात आणि उपग्रहीय तंत्रज्ञानात आपण किती पुढे आहोत, यावर अवलंबून आहे, हे असे रडवे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतासारख्या ‘गरीब’ मानल्या जाणाऱ्या देशाने कोरोनाचा उद्रेक, बलाढ्या देशांपेक्षाही अधिक चांगल्या रितीने थोपविला, हे दूरसंचार क्रांतीमुळेच शक्य झाले. त्याचप्रमाणे नुकत्याच पाकिस्तान विरोधात घडविलेल्या ‘सिंदूर अभियाना’च्या मोठ्या यशातही इस्रोच्या अवकाश संशोधनाचा आणि अवकाश तंत्रज्ञानाचा निर्णायक सहभाग राहिला आहे, हे नोंद करण्यासारखे आहे. त्यामुळे भारताला आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट आणि प्रगत करायची असेल, तर, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, उद्योगव्यवस्था, कृषीव्यवस्था, ऊर्जानिर्मिती व्यवस्था आदी क्षेत्रांचा भरभक्कम विकास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारताने दूरसंचार क्षेत्रात जगातील पहिल्या तीन राष्ट्रांच्या तोडीस तोड कामगिरी केली पाहिजे. कारण आजच्या युगात या सर्व क्षेत्रांमध्ये वाढ आणि प्रगती साधायची असेल, तर दूरसंचार क्षेत्रात आपण स्वबळावर अग्रेसर असलेच पाहिजे. दूरसंचार क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी आपल्याला आतापेक्षाही मोठ्या प्रमाणावर अवकाश संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञान विकास क्षेत्रात गुंतवणूक करावी लागणार आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली, तरच देशाच्या सरकारचे उत्पन्न वाढणार. तसे उत्पन्न वाढले तरच सरकार गरिबांचे अधिकाधिक कल्याण करु शकेल. अन्यथा, गरिबांच्या कल्याणाची भाषा केवळ गरिबांच्या नावाने आगखाऊ भाषा करण्यापुरतीच मर्यादित राहील. प्रत्यक्षात गरिबी दूर करणे शक्यच होणार नाही. अवकाश संशोधन, अवकाश तंत्रज्ञान विकास आणि गरिबी उन्मूलन यांचा असा हा अन्योन्य संबंध आहे. हे लक्षात घेतल्यास अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे, हे समजून येते. त्यामुळे संकुचित मनोवृत्ती आणि अर्थसंबंधातील अज्ञान दूर करुन याकडे पाहण्याची आवश्यकता आहे.








