‘अॅक्सिओम-4’ मोहीम 22 जूनलाही होणार नाही
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
आता 22 जून रोजीही अॅक्सिओम-4 मोहीम सुरू होणार नसल्यामुळे शुभांशू शुक्ला याचे अंतराळ उड्डाण आणखीनच रखडले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडून (आयएसएस) अॅक्सिओम-4 मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूलच्या दुरुस्तीनंतर आयएसएसच्या ऑपरेशनचे मूल्यांकन करण्यासाठी नासाला अधिक वेळ आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आयएसएस’च्या अधिकृत एक्स हँडलवरून शुक्रवारी सकाळी यासंबंधीची माहिती देताना ‘22 जून, रविवारी प्रक्षेपण होणार नाही. येत्या काही दिवसांत नवीन तारीख दिली जाईल’ असे जाहीर करण्यात आले आहे.
‘अॅक्सिओम-4’ या मोहिमेचे नेतृत्व पेगी व्हिटसन करणार आहेत. तर इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला या मोहिमेचे पायलट असतील. त्यांच्यासोबत युरोपियन स्पेस एजन्सी, पोलंडचे सॅवोस उज्नास्की-विनिव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन तज्ञ म्हणून कार्यरत असतील. सुरुवातीला ही मोहीम 29 मे रोजी सुरू होणार होती. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आतापर्यंत ही मोहीम लांबणीवर पडत चालली आहे.









