अंतराळप्रवासाविषयी दिली माहिती : अंतराळातून काढलेली छायाचित्रे दिली भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) जात इतिहास रचणारे ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना अंतराळप्रवासाविषयी माहिती दिली. तसेच अंतराळात राबविलेल्या प्रयोगांविषयी शुभांशु यांनी पंतप्रधानांना सांगितले. आहे. तर पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेत शुभांशु यांचे कौतुक केले आहे. शुभांशू यांनी पंतप्रधान मोदींना आयएसएसवरून टिपलेली पृथ्वीची छायाचित्रे भेटवस्तू म्हणून दिली आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरले आहेत. शुभांशु शुक्ला हे रविवारी सकाळी भारतात परतले होते. दिल्ली विमानतळावर शुक्ला यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इस्रो प्रमुख व्ही. नारायणन समवेत अनेक मान्यवर शुभांशु यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. शुभांशु यांच्या पत्नी कामना आणि पुत्र कियाश देखील स्वागत करण्यासाठी विमानतळावर हजर होता.
शुभांशु हे सुमारे एक वर्षानंतर मायदेशी परतले आहेत. आयएसएसवर जाण्यासाठी शुभांशु यांना जवळपास एक वर्षापर्यंत अमेरिकेत प्रशिक्षण घ्यावे लागले. शुभांशु यांच्यासोबत ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे देखील भारतात परतले, अॅक्सिओम-4 मोहिमेसाठी बॅकअप अंतराळवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
पंतप्रधानांची भेट घेतल्यावर शुभांशु हे स्वत:च्या शहरी म्हणजेच लखनौ येथे जाणार आहेत. लखनौमध्ये शुभांशु यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर 22-23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन सोहळ्यात भाग घेण्यासाठी ते दिल्लीत परततील.
लोकसभेत विशेष चर्चा
शुभांशु शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेसंबंधी लोकसभेत विशेष प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यात आली. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा अंतराळप्रवास आणि सुरक्षित वापसी पूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण असल्याचे उद्गार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काढले आहेत. शुभांशु शुक्ला यांच्याप्रमाणे अंतराळवीर होण्याचे स्वप्न आता प्रत्येक मूल पाहत आहे. पूर्ण देश शुभांशु यांच्या अंतराळयात्रेचा जल्लोष साजरा करत असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
आयएसएसवर 18 दिवस
शुभांशु हे अॅक्सिओम-4 मोहिमेचा हिस्सा होते. ही मोहीम फ्लोरिडातून 25 जून रोजी रवाना झाली आणि 26 जून रोजी आयएसएसवर पोहोचली होती. शुभांशु हे 15 जुलै रोजी पृथ्वीवर परतले होते. 3 अन्य अंतराळवीर पॅगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) यांच्यासोबत शुभांशु यांनी 18 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 60 हून अधिक प्रयोग आणि 20 आउटरीच सत्र आयोजित केले होते.









