राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतील यशाची दखल
प्रतिनिधी /कुडचडे
गुजरातमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत कुडचडेतील श्रुंगी बांदेकरने जलतरणातील 200 मीटर शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी तिच्या कुडचडे येथील घरी जाऊन तिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडचडे पालिका नगराध्यक्षा जस्मिन ब्रागांझा, नगरसेवक विश्वास सावंत, प्रमोद नाईक, राजेंद्र वस्त, नवीन खांडेकर आदी उपस्थित होते.
कुडचडे भागातील श्रुंगीने राष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या बळावर कांस्यपदक प्राप्त केले. यासाठी श्रुंगीबरोबर तिचे आई-वडील व इतर सर्व कुटुंबियांचे आपण अभिनंदन करतो. त्याचबरोबर पुढे तिला असेच यश प्राप्त होऊ दे अशी शुभेच्छा देतो, असे उद्गार याप्रसंगी मंत्री काब्राल यांनी काढले. आपण प्रयत्न केले हे खरे, पण या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना व अन्य कुटुंबियांना जाते. कारण त्यांच्या पाठबळाशिवाय हे यश आपण प्राप्त करू शकले नसते. त्यामुळे सर्वांत आधी देव आणि त्यानंतर आपण कुटुंबियांची आभारी आहे. मंत्री काब्राल व इतर सर्व मान्यवरांनी येथे येऊन आपला जो सन्मान केला आहे त्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला आहे, असे उद्गार श्रुंगी बांदेकर हिने काढले.









