कसबा बावडा / सचिन बरगे :
येथील श्रीराम उद्यानाची दुरावस्था झाली असून उद्यानातील झोपाळे, ओपन जिम तसेच बसण्यासाठी ठेवलेली बाकडे मोडकळीस आली आहेत. त्याचबरोबर या उद्यानात लावलेली झाडे पाण्याअभावी अक्षरश? करपू लागली आहेत. पिण्याचे पाणी बागेत न येता गळतीमुळे थेट गटारीत सोडले आहे. येथे ना सुविधा ना स्वच्छता… येथे फक्त उद्यानाची दुरावस्था पाहायला मिळत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कसबा बावडा येथील लहान मुलांसह थोरा – मोठ्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि ज्येष्ठांसाठी महापालिकेने येथील भाजी मंडई एरियामध्ये श्रीराम उद्यानाची स्थापना केली. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी विविध उपकरणे, झोपाळे, तराजू यासह थोरामोठ्यांसाठी ओपन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. उद्यानामध्ये दररोज सकाळी व सायंकाळी फिरायला येण्राया नागरिकांची संख्या मोठी असते. दरम्यान गेले काही महिने या उद्यानाकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. सफाई कामगार नसल्यामुळे येथील बागेत कच्रयाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी लावण्यात आलेले विद्युत दिवे फुटलेल्या अवस्थेत आहेत. झाडांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी या ठिकाणी विहीर असून या विहिरीतून मोटर द्वारे पाणी उपसा करून बागेतील झाडांना देऊन त्यांची निगा राखली जाते. पण सध्या येथील मोटर अनेक दिवस नादुरुस्त असल्यामुळे झाडांना पाणीच मिळत नाही. पाण्याविना झाडे अक्षरश? करपू लागली आहेत. नागरिकांना निवांत बसण्यासाठी ठेवण्यात आलेली बाकडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा असलेल्या या बागेत सर्वत्र प्लास्टिकचे ग्लास व कचरा पसरला आहे. अशा या श्रीराम उद्यानाची सध्याची अवस्था दयनीय असून याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
- रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा
येथील श्रीराम उद्यानात रात्री आठ नंतर मद्यपींची गर्दी पाहायला मिळते. काही हुल्लडबाज तरुण या ठिकाणी मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या व प्लास्टिकचे ग्लास तेथेच टाकून जातात. गुटखा व माव्याच्या पिचकारीमुळे बागेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
- पिण्याचे पाणी थेट गटारीत
बागेत येण्राया नागरिकांसाठी येथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. श्रीराम सोसायटी दूध डेअरी समोरून ही पाइपलाइन श्रीराम उद्यानात नेण्यात आली आहे. ही पाइपलाइन गटारीच्या शेजारीच फुटली आहे. एक वर्ष झाले या पाइपलाइनमधून पाणी उद्यानामध्ये न जाता गटारीतून वाहून जात आहे.
- दोन दिवसात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार
काही दिवस झाले श्रीराम उद्यानामध्ये दररोज साफसफाई होत नाही. येथे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. मोटर खराब झाल्याने येथील झाडांना पाणीही देता येत नाही. या अशा अनेक समस्या संबंधित महापालिका प्रशासनास कळवून दोन दिवसात बागेतील स्वच्छता व पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माजी नगरसेवक : श्रावण फडतारे








