बाळेकुंद्रीनगरी सज्ज : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर/सांबरा
श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 120 व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवार दि. 8 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून उत्सवासाठी बाळेकुंद्रीनगरी सज्ज झाली आहे. उत्सवाची श्रीदत्त संस्थानच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता श्रीपंत वाडा, समादेवी गल्ली, बेळगाव येथून प्रेमध्वज मिरवणूक निघेल. बेळगाव शहरातून मार्गक्रमण करत सांबरामार्गे प्रेमध्वज मिरवणूक दुपारी 2 पर्यंत श्रीपंत बाळेकुंद्री येथील वाड्यामध्ये पोहोचेल. सायंकाळी 5 वाजता श्रीपंत वाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक निघेल व रात्री 8 वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन मुख्य उत्सवाला सुरुवात होईल.
गुरुवार दि. 9 रोजी पहाटे 5 वाजता श्रींचा पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. सकाळी 7 वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून 2 प्रहरी आमराईतील श्रीपंत स्थानी येईल व रात्री 8 ते 12 या वेळेत पालखी सेवा होईल. उत्सवासाठी मंगळवारपासूनच पंतभक्त दाखल होऊ लागले आहेत. उत्सवानिमित्त विविध स्टॉल्स, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे दाखल झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्या दृष्टीने सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भक्तांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्यावतीने उत्सवानिमित्त शहर बसस्थानक येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. भक्तांनी पुण्यतिथी उत्सवाचा लाभ घ्यावा, असे श्रीदत्त संस्थानच्यावतीने कळविले आहे.









