मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : श्रीपादभाऊंच्या खासदारकीचा रौप्य महोत्सव
पणजी : श्रीपादभाऊ नेहमीच साधू-संतांचा आदरसत्कार करीत आले आहेत. साधू-संतांचे कृपाआशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहिले आहेत. भाऊ आम्हां सगळ्यांसाठी, भाजपासाठी एक स्वामी आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.उत्तर गोव्याचे खासदार म्हणून 25 वर्षें पूर्ण करणाऱ्या श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त काल बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. नाईक यांच्या सांपेद्र येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेल्या आला. कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उद्योजक श्रीनिवास धेंपे, भाजपाचे गोवा राज्य सचिव दामू नाईक, भाजपाचे उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, डॉ. गोविंद काळे, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, धारगळच्या डिन डॉ. सुजाता कदम, भाजपा गोवा युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, ओबीसी आयुक्त अॅड. मनोहर आडपईकर, नागेश फडते आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊंच्या विकासकामांवर पुस्तक काढावे लागेल
भाऊंनी गोव्यासाठी काय केले, असा सवाल करणाऱ्यांनी धारगळला दिमाखात उभ्या असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट देऊन पहावे. देशातील आयुर्वेद क्षेत्रातील एक अग्रगण्य असे इस्पितळ श्रीपादभाऊंनी गोव्यात आणले. त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घ्यायचा ठरवला तर 300 ते 400 पानांचे पुस्तक काढावे लागेल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
विकास पाहून गोव्यात येणारे लोक होतात अवाक
तीन-चार वर्षांनंतर गोव्यात येणारे लोक विकसित गोवा पाहून अवाक होतात, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की गोव्याच्या विकासात श्रीपादभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. धारगळच्या आयुर्वेद इस्पितळाचा पाया त्यांनी घातला आणि एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णही केला. करंझाळे, पणजी येथे लवकरच पूर्ण होऊ घातलेले राष्ट्रीय जलक्रीडा प्रकल्प त्यांनीच गोव्यात आणले. त्यांनी पाया घातलेली उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात जिल्हा आयुष इस्पितळे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
श्रीपादभाऊंचे निवासस्थान सर्वांचेच आश्रयस्थान
गेली 25 वर्षें भाऊंचे दिल्लीताल एक लोदी इस्टेट सरकारी निवासस्थान तर सगळ्यांचेच आश्रयस्थान आहे. त्या बंगल्यावर निवासाची व जेवणाखाण्याची सोय करताना किंवा विकासकामे करताना सर्वसान्यांचे नेते मानल्या जाणाऱ्या भाऊंनी धर्म, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याची जनता त्यांना पुन्हा निवडून देईल, याबद्दल मला ठाम विश्वास आहे, असे डॉ. सावंत पुढे म्हणाले.
लोकांची काळजी घेणारा तपस्वी : नाईक
भाजपा ऊजला नव्हता, तेव्हा लोक या पक्षाला भाजीपाव म्हणून हिणवायचे. भाऊंच्या अथक प्रयत्नांमुळे हाच पक्ष आज गोव्यात सत्तेवर आहे. श्रीपादभाऊ एक लोकांची काळजी घेणारा लोकनेता, एक तपस्वी आहे, असे गोवा राज्याचे भाजपा सचिव दामू नाईक म्हणाले.
चांगली कामे करण्याची ताकद जनतेने दिली : श्रीपादभाऊ
समाज कर्तव्याचे भान ठेऊन कार्य केले तर समाजोन्नती नक्कीच होते. समाज एकमेकाच्या सहाय्याने पुढे जातो. काही चांगल्या गोष्टी करण्याची ताकद आपणास आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने दिली. त्यांनी दिलेल्या ताकदीमुळे प्रलोभनांना आपण बळी पडलो नाही, असे केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ म्हणाले. याप्रसंगी प्रसाद नेत्रालयाचे कृष्णप्रसाद, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उद्योजक श्रीनिवास धेंपे यांनीही आपली मनोगते व्यक्त करताना श्रीपाद नाईक यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी काही निवडक शाळांना कंप्युटर्स, एलसीडी प्रॉजेक्टर्स, सेनेटरी नॅप्किन डिस्पेंसर्स आणि इंन्सिनरेटर्स प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले.









