प्रतिनिधी / बेळगाव
आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच अमेरिकेमध्ये खासदार म्हणून निवडून आलो. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नकोस, आत्मविश्वास गमावू नकोस, या संस्कारांचे महत्त्व माझ्या यशामध्ये प्रामुख्याने आहे. शिक्षण आणि मानसिक अस्वास्थ्य या दोन क्षेत्रांमध्ये मला काम करावयाचे असून शिक्षणाला तरणोपाय नाही हे लक्षात घ्या, असे आवाहन बेळगावचे सुपूत्र श्रीनिवास ठाणेदार यांनी केले. एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. बेळगाव भेटीवेळी कॉलेजतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर होते.
श्रीनिवास ठाणेदार म्हणाले, जगभर फिरत असलो तरी हा आपल्या घरचा सत्कार, अशी माझी भावना आहे. अमेरिकेमध्ये विद्यार्थी पदवीधर होतो तेव्हा त्याच्या डोक्यावर कर्ज असते. त्याची त्याला परतफेड करावी लागते. शिक्षण महागडे होऊ नये असे माझे मत आहे. कारण ती फार मोठी गुंतवणूक आहे. म्हणूनच आपण मिशीगनमध्ये पाच शाळा उभारत असून अल्पदरात शिक्षण मिळावे यावर माझा भर आहे. जगभरात मानसिक अस्वास्थ्य वाढत असून त्यासाठी व शिक्षण या दोन क्षेत्रात मला काम करावयाचे आहे. जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढले आहे. अमेरिकेत शिक्षण उत्तम असले तरी महागडे आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
किरण ठाकुर यांनी एसकेईतर्फे व लोकमान्य सोसायटीतर्फे त्यांचा सत्कार केला. श्रीनिवास ठाणेदार यांनी साधेपणा जपला आहे, असे त्यांनी सांगितले. बेळगावसाठी आपण काय करू शकतो? या ठाणेदार यांच्या प्रश्नावर अमेरिकेतील एका दर्जेदार विद्यापीठाशी एसकेई सोसायटी सलग्न करा, अशी अपेक्षा किरण ठाकुर यांनी व्यक्त केली. प्राचार्या अनुजा नाईक यांनी परिचय करून दिला. प्रा. संदीप देशपांडे यांनी आभार मानले.









