प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : भाजपविरोधातील देशातील इतर राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची शुक्रवारी मुंबईत बैठक सुरू असताना जालना जिल्ह्यातील गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर बेछुट लाठीमार होतो,ही घटना योगायोग कशी समजायची,अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू छत्रपतींनी शनिवारी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.त्यांची ही प्रतिक्रिया एकप्रकारे भाजप सरकारच्या विरोधात शंका उपस्थित करणारी आहे.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले,इंडियाच्या बैठकीला मुंबईत देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते आले होते.ते एकाच व्यासपीठावर होते.त्याचवेळी जालना जिह्यातील गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीमार होतो.हा निव्वळ योगायोग कसा समजायचा? माध्यमांसह सर्वांचेच लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीचार्ज झाला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते.अचानक असे काय घडले की,पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला.आंदोलकांना पांगविण्यासाठी कारवाई करावी लागली,हे निषेधार्ह आहे.लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले?,का दिले?याची चौकशी होण्याची गरज आहे.सरकारने ते जनतेपुढे स्पष्ट केले पाहिजे,असेही श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितले.









