प्रतिनिधी,कोल्हापूर
जुना बुधवार पेठ कोल्हापुरातील सर्वात जुनी पेठ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याचे या पेठेशी जवळचे नाते आहे. स्वतंत्र्यसैनिक, कलाकार, उद्याजकांनी बुधवार पेठेची ओळख जगभर आहे. प्रा. दिनेश डांगे संपादित ‘ओळख जुना बुधवार पेठेची’ या पुस्तकातून बुधवार पेठेच्या रूपाने येथील जनतेचा इतिहास जगभर पोहचेल, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले.
प्रा. दिनेश डांगे संपादित ‘ओळख जुना बुधवार पेठेची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जुना बुधवार पेठ ब्रह्मपुरी येथील अभिषेक लॉन हॉलमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.बुधवार पेठेत राहून सैनिक, शिक्षण, कलाकार, उद्योजक, आदी क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कुटुंबियांचा सन्मान केला. बुधवार पेठेचा इतिहास सांगणारा प्रा.डांगे यांनी लिखित पोवाडा शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला.बुधवार पेठेपासून ते अभिषेक लॉक हॉलपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, बुधवार पेठेत ब्रम्हपुरी असल्याने बावीसशे वर्षापूर्वीचा या पेठेचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे.प्राचीन काळापासून बुधवार पेठेत मोठ्या व्यक्तींची जडण-घडण झाली आहे.दसरा चौकात सिमोलंघनाचा सोहळा झाल्यानंतर सिध्दार्थ नगरमध्ये पालखी घेवून जाण्याची प्रथा राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केली. अशी अनेक प्रसंग या पुस्तकात मांडून सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.तरूणांनी हे पुस्तक वाचले पाहिजे,असे आवाहनही श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, जुना बुधवार पेठेतील विवेकानंद जुनिअर कॉलेजमध्ये माझे शिक्षण झाले आहे.तसेच वडणगे माझे अजोळ असल्याने बुधवार पेठेतून मी अनेकदा जातो, त्यामुळे मला या पेठेविषयी अतिशय जिव्हाळा आहे.शिवाजी विद्यापीठाचा पहिला ठराव बुधवार पेठेतूनच पाठवला होता.तसेच येथील अनेकांनी विद्यापीठाची सेवा केली असून प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांचे खरे वारसदार या पेठेतच आहेत.तसेच शेती,उद्योग,कला,क्रीडा,शिक्षण,संगीत क्षेत्रात बुधवार पेठेची जगभर ओळख आहे. या पेठेचा महान वारसा असलेल्या पुस्तकाचे येथे पारायण झाले पाहिजे. तसेच या पेठेच्या गतवैभवाचा वारसा तरूणांनी जपावा.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या,या पुस्तकात जुना बुधवार पेठेची ओळख करून दिली आहे. या पेठेची संस्कृती पुढच्या पिढीने जपली पाहिजे.तसेच शहरातील प्रत्येक पेठेच्या इतिहासावर एक पुस्तक लिहिले पाहिजे.विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले,बापूजी साळुंखे यांनी जुना बुधवार पेठेत ज्ञानाचा यज्ञ सुरू केला. आजही येथे विवेकानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या रूपाने सुरू आहे.माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले,जुना बुधवार पेठ,शिवाजी पेठ असो वा कोल्हापुरातील सर्वच पेठांनी पानसुपारी कार्यक्रमातून माणुसकी जपली.सर्वच तालमींनी राजर्षी शाहूंचा वारसा जपला आहे.
माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी प्रास्ताविक केले.लेखक प्रा. दिनेश डांगे यांनी पुस्तकाची ओळख करून दिली.उद्योजक उत्तम फराकटे यांनी जुना बुधवार पेठेच्या वतीने मनोगत व्यक्त केले.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्यउपाध्यक्ष वसंतराव मुळीक,बाबा महाडीक,बाळ घाटगे,अनिल पाटील,भागातील पुरूष,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.