आजीच्या कौशल्याचे सोशल मीडियावर कौतुक
छंदापोटी माणूस इतरांना शक्य होत नाहीत अशा गोष्टी सहजपणे करून दाखवू शकतो. या छंदामुळे अनेकांना वेगळी ओळख प्राप्त होत असते. आसामच्या जोरहाटमध्ये राहणाऱ्या हेमप्रथा नावाच्या 62 वर्षीय आजींनी लहानपणीच हातमागावर विणकाम करून कापड बनविणे शिकले होते. पण कालांतराने विणकाम हा त्यांचा छंद झाला. हाच छंद जोपासत त्यांनी तयार केलेल्या एका गोष्टीने आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आजींनी हातमागाच्या सहाय्याने रेशमी कापडावर भगवद्गीतेचे श्लोक विणकाम करत तयार केले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये या आजी हातमागाच्या सहाय्याने कापडावर विणकाम करताना दिसून येतात. अशाच प्रकारे विणकाम करत त्यांनी रेशीम कापडावर संस्कृत, इंग्रजी अणि आसामी भाषांमध्ये भगवद्गीतेचे श्लोक तयार केले आहेत. हेमप्रभा आजींनी विणकामातून तयार केलेल्या या गोष्टीबद्दल यापूर्वी कोणी विचारही केला नसेल.
हेमप्रभा यांनी 2 वर्षांमध्ये 250 फूट लांब कापडावर संस्कृतमध्ये भगवद्गीता तयार केली आहे. यानंतर त्यांनी कापडावर आसामी आणि इंग्रजी भाषेत भगवद्गीतेचे श्लोकही विणले. मात्र इंग्रजीतील श्लोक त्यांना वाचता येत नाही. इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील जवळपास 700 श्लोक त्यांनी अशाप्रकारे कापडावर विणले आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 70 हजार लोकांनी लाइक केले असून हजारो लोकांनी यावर टिप्पणी केली आहे. अनेक युजर्सनी हेमप्रभा यांच्या कामाचे कौतुक केले आहे. हेमप्रभा यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जावे अशी मागणी एका युजरने केली आहे.









