कैद्याने रेखाटलेले चित्र न्यायाधीशांनी केले खरेदी
प्रतिनिधी/बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने काढलेली श्रीकृष्णाचे सुंदर चित्र न्यायाधीशांनी खरेदी केले आहे. कैद्याच्या कलाकृतीने चक्क न्यायाधीशांवर भुरळ टाकली असून लवकरच ही कलाकृती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे चेअरमन बी. विराप्पा यांनी हिंडलगा कारागृहाला अचानक भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याचवेळी मंजुनाथ नामक कैद्याने रेखाटलेली श्री कृष्णाचे चित्र न्यायाधीशांना आवडले.
बी. सी. मंजुनाथने ही कलाकृती न्यायाधीशांना भेट स्वरुपात देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी मोफत देत असाल तर नको त्याची किंमत माझ्याकडून घ्या आणि ती कलाकृती मला पोहोचवा, अशी सूचना न्यायाधीशांनी केली. त्याच्यासाठी लागणारे पैसे स्वतः मोजण्याची त्यांनी कारागृह अधिकाऱयांना सांगितले आहे. न्यायाधीशांना भुरळ घातलेल्या कलाकृतीला सागवाणीचे प्रेम बसविण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती बी. विराप्पा यांना ही कलाकृती पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृहाचे मुख्य अधिक्षक कृष्णकुमार यांनी दिली. कैद्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची इच्छाही त्यांनी दर्शविली.









