उदगाव प्रतिनिधी
उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री उदयसिध्द बिरदेव ची यात्रा शनिवारी/रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यानिमित्ताने येथील माळावरील मंदिरात पहाटे अभिषेक, धार्मिक , पारंपारिक विधी करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांबरोबर कर्नाटकातील व आंध्रा मधील भाविकांनी आपले नवस पुर्ण केले. उदयसिध्दांच्या नावानं चांगभलं.. बिरोबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात भंडारा व खोबर्याची उधळण वालुगाच्या निनादात करण्यात आली.
उदगांव येथील पुरातन असलेल्या श्री उदयसिध्द बिरदेवाची यात्रा विजयादशमी दसरा नंतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात प्रथमच होते. गेल्या आठ दिवसापासून समस्त धनगर समाजाच्यावतीने या यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी धार्मिक विधी पुर्ण झाल्यानंतर श्री उदयसिध्द बिरदेवाची आकर्षक स्वरूपात पुजा बांधण्यात आली होती. दिवसभरात भंडारा व खोबर्याची उधळण केल्याने मंदिर परिसर सुवर्णमय झाला होता.
सायंकाळी वालूगाच्या वाद्यात मानकरी व कर्नाटकातील भाविकांनी हेडम व सबीना खेळला. यानंतर देवर्षी पुजारी यांची भाकणूक झाली. सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जयसिंगपूर पोलिसांनी यात्रेत कडक बंदोबस्त ठेवला होता. रविवारी सकाळी माळावरील देव वालगाच्या वाद्यात गावातील मंदिरात आणण्यात आले. यात दिवसभरात ठिकठिकाणी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सकापासूनच दुपारपर्यंत गावामध्ये ढोल च्या गजरात गावात पालखी मिरवणूक आली येथील ग्रामपंचायत जवळ हेडाम ,भाकणूक झाली मोठ्याप्रमाणात भंडार्याची उधळण करण्यात आली. यात्रेमुळे गावात भंडार्याने सोन्याची झळाळी आली होती.









