वृत्तसंस्था / नवी दिल्ली, न्यूयॉर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेशरिका दौऱ्याला प्रारंभ झाला आहे. त्यांचे भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 10 वाजता न्यूयॉर्क येथे आगमन झाले आहे. गुरुवारी त्यांचे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहात संयुक्त बैठकीसमोर भाषण होणार आहे. त्याआधी बुधवारी त्यांच्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी शाही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अमेरिकेच्या संसदेत त्यांचे स्वागत अमेरिकन काँग्रेसमध्ये नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे प्रतिनिधी (खासदार) आणि बेळगावचे सुपुत्र श्री ठाणेदार हे करणार आहेत.
पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या निमंत्रणावरुन तेथे गेले आहेत. हा त्यांचा अधिकृत अमेरिका दौरा असून एकंदर तो सातवा अमेरिका दौरा आहे. ते साधारणत: 72 तास अमेरिकेत व्यतीत करणार असून या कालावधीत त्यांचे 10 मोठे कार्यक्रम आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे तीन कार्यक्रम आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांशी विस्तृत द्विपक्षीय चर्चा, अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण आणि अमेरिकेतील भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद, असे हे तीन कार्यक्रम आहेत.
योगदिन कार्यक्रमाचे नेतृत्व
या कार्यक्रमांपूर्वी ते बुधवारी न्यूयॉर्क येथींल संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. ते या दौऱ्यात अमेरिकेच्या उद्योगपतींशीही चर्चा करणार असून त्यांना भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात महत्वाचे अनेक करार होण्याची शक्यता असून त्यात अमेरिकेकडून अत्याधुनिक ड्रोन्स विकत घेण्यासाठीच्या कराराचा समावेश आहे. याशिवाय महत्वाच्या संरक्षण सामग्रीचे सहउत्पादन भारतात करणे, भारताच्या युद्धविमानांसाठी इंजिनांचे सहउत्पादन, अत्याधुनिक संरक्षण सामग्रीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, आर्थिक आणि व्यापारी गुंतवणूक वाढविण्यासंबंधीची चर्चा, भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि सामरिक धोरण सहकार्य, आदी अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.
दोन्ही देशांमध्ये उत्सुकता
अमेरिकेच्या त्यांच्या या दौऱ्याच्या फलितासंबंधी दोन्ही देशांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वर्तुळांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच दोन्ही देशांच्या सर्वसामान्यांच्या मनातही या दौऱ्यासंबंधी कुतुहल आणि अपेक्षाही आहेत. या दौऱ्याला गेले काही दिवस मोठी प्रसिद्धी मिळाल्याने त्याकडे जगाचेही लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेच्या संसदेसमोर दोनदा भाषण करण्याची संधी मिळालेले ते प्रथमच भारतीय नेते होणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध अधिकच दृढ होतील असे तज्ञांचे मत आहे.
श्री ठाणेदार यांना आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या संसदेसमोर भाषण करण्यासाठी सभागृहात आल्यानंतर त्यांना भाषणाच्या स्थानी घेऊन जाण्याचा मान बेळगावचे सुपुत्र श्री ठाणेदार यांना मिळणार आहे. ठाणेदार यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगावात झाले. नंतर ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनीं यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. उद्योजग म्हणून कार्यरत असतानाच ते अमेरिकेच्या सामाजिक जीवनाशीही समरस झाले. त्यांच्या अविरत आणि उपयुक्त समाजकार्यामुळे ते मिशिगन (13 वा जिल्हा) या मतदारसंघातून अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (अमेरिकन काँग्रेस) लोकप्रतिनिधी (खासदार) म्हणून डेमॉक्रेटिक पक्षाच्या वतीने निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणाच्या स्थानी घेऊन जाण्याचे उत्तरदायित्व मिळाल्यामुळे ठाणेदार यांनी आनंद व्यक्त केला. ठाणेदार यांनी अमेरिकेत हिंदू समाजाचे अधिष्ठान भक्कम करण्यासाठी लोकप्रतिनिधी गृहात हिंदू गट (हिंदू कॉकस) नुकताच स्थापन केला आहे. आपण आणि आपली पत्नी शशि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यासंबंधी उत्सुक आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचे आपल्यालाही निमंत्रण आहे, ही आपल्यासाठी विशेष समाधानाची बाब आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधींल संबंध उत्तरोत्तर दृढ होतील. ती संधी या दौऱ्याने दिली आहे, असे उद्गार त्यांनी ‘तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेल्या संवादात काढले.









