विविध कार्यक्रमांची रेलचेल : भक्तांची लगबग
प्रतिनिधी/ बेळगाव
समादेवी गल्ली येथील वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळतर्फे शनिवारपासून श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. शनिवारी पहाटे चौघडा व काकड आरती झाली. त्यानंतर सकाळी 7 वा. कुंकुमार्चननंतर मान्यवरांच्या हस्ते श्री देवी दरबारचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सनातन संस्थेच्या अर्चना घनवट, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतूरकर, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, सुदेश पाटणकर, मोतीचंद दोरकाडी, परेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
यावेळी अर्चना घनवट यांनी मनोगत व्यक्त करताना शास्त्र समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. मनुष्य जन्म सार्थकी लावण्यासाठी शास्त्र गरजेचे आहे. आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण आणि गुरुदेव दत्त नामस्मरणही आवश्यक असल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी 2 वा. प. पू. श्री कलावती माता यांचे भजन झाले. त्यानंतर 3 वा. स्वरगंधा भजनी मंडळाचे भजन, दुपारी 4 वा. यमुनाक्का भजनी मंडळाचे भजन तर 5 वा. श्री वामनाश्रम स्वामींचा सत्संग व 6 वा. दीपा तबला वादनकडून भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. रात्री 7 वा. ऋषिकेश हेर्लेकर यांचा संगीत संध्या गायन कार्यक्रम रंगला. सकाळपासून समादेवी मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, उपाध्यक्षा वर्षा सटवाणी, खजिनदार अक्षता कलघटगी, स्मिता नाकाडी, वैशाली पालकर, जयश्री हणमशेट यासह विश्वस्त, सभासद, सल्लागार आणि भक्त उपस्थित होते.
रविवार दि. 9 रोजी पहाटे चौघडा व काकड आरती, लक्ष पुष्पार्चन, दुपारी विविध भजनी मंडळांचे भजन, त्यानंतर रात्री सुगम संगीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.









