बेळगाव : श्रीराम नवमीनिमित्त जय अमर शिवाजी युवक मंडळ कुरबुर गल्ली अनगोळ, श्रीराम युवक मंडळ नाथ पै नगर अनगोळ व श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्यावतीने श्रीराम नवमीनिमित्त शनिवारी सायंकाळी अनगोळ येथे श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम नवमीच्या निमित्ताने अनगोळ नाका येथून प्रभु श्री रामाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जय अमर शिवाजी युवक मंडळ कुरबुर गल्ली यांच्यावतीने आकर्षक रथ तयार करण्यात आला होता. रथामध्ये श्री रामाची सिंहासनावर विराजमान मूर्ती ठेवली होती. प्रमुख पाहुणे म्हणून रुद्रकेसरी मठाचे स्वामीजी प. पू. हरिगुरु महाराज यांच्या हस्ते मूर्ती तसेच पालखी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी, मंडळाचे अध्यक्ष हर्षद जाधव, उपाध्यक्ष बिटू लोहार तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी अनगोळ नाका ते कुरबुर गल्लीपर्यंत रथ ओढला. यावेळी अनगोळ गावातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम युवक मंडळ नाथ पै नगर
श्रीराम युवा मंडळ श्रीराम सेना हिंदुस्थान नाथ पै नगर यांच्यावतीने श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रा अनगोळ नाक्यापासून काढण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, श्रीकांत कुऱ्याळकर, सामाजिक कार्यकर्ते राजु लोहार, उमेश कुऱ्याळकर, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजेरी व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची पूजा करून मिरवणुकीला चालना दिली. मिरवणूक अनगोळ मुख्य रस्त्यावरून धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, बाबले गल्ली, नाथ पै नगर येथे पोहचली. ठिकठिकाणी महिलांनी आरती करून पूजन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गावातील युवक, श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभागातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









