वार्ताहर /सांबरा
कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 118 व्या पुण्यतिथी उत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी बेळगाव शहरातील समादेवी गल्लीतील पंतवाडा येथून श्री प्रेमध्वज मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री, रंजन पंत बाळेकुंद्री, संजीव पंत बाळेकुंद्री, अभिजीत पंत बाळेकुंद्री व डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांनी पालखी व प्रेमध्वजाचे पूजन करून मिरवणुकीला चालना दिली. याप्रसंगी पंतभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक समादेवी गल्ली, खडेबाजार, गांधीनगर, सांबरामार्गे पुढे मार्गस्थ झाली. मिरवणुकीचे ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. दुपारी मिरवणूक मुतगे येथे पोहोचल्यानंतर प्रेमध्वजाचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य मारुती पाटील यांनी आरती ओवाळून प्रेमध्वजाचे पूजन केले. अजित पुजारी यांनी पालखीचे पूजन केले. मिरवणूक दुपारी चार वाजता गावातील पंतवाड्यात पोहोचली. प्रेमध्वज मिरवणुकीमध्ये गारगोटी येथील पंतभक्त श्रींची पालखी घेऊन सहभागी झाले होते. तर यमुनाक्का भजनी मंडळ, पंतभक्त भजनी मंडळ बेळगाव तसेच हलकर्णी, उचगाव, नाशिक, जळगाव आदी ठिकाणचे पंतभक्त सहभागी झाले होते. यावेळी श्री पंतनामाचा गजर करत अखंड भजनसेवाही करण्यात आली.
आज यात्रेचा मुख्य दिवस
मंगळवार दि. 31 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे पाच वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. तर सकाळी सात वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून दुपारी श्री पंतस्थानी पोहोचेल. रात्री आठ ते बारा या वेळेत पालखी सेवा होईल.









