25 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत वार पाळणूक : रेडा सोडणे कार्यक्रम
वार्ताहर/अगसगे
अगसगे गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 2026 मध्ये होणार आहे. त्यानिमित्त गावात पाच वार पाळून रेडा व पालवा सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. मुहुर्तानुसार दि. 25 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी व मंगळवारी गावात कटबंद वार पाळण्यात येणार आहे. यात्रा तब्बल 17 वर्षांनंतर भरवण्यात येणार आहे. मंगळवार दि. 8/04/25 रोजी गावातील सर्व मंदिरांमध्ये पूजाअर्चा होणार आहे आणि श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रेडा व पालव्याचे श्री लक्ष्मी मंदिरासमोर पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर धनगर वाद्य व बॅन्जोसह गावांमध्ये मिरवणूक होणार आहे. गावातील स्वामी शिवलिंग हिरेमठ यांच्याकडे देवस्थान पंचकमिटी गुऊवार दि. 21 रोजी जाऊन वरील तारीखमध्ये वार पाळण्याचे दिवस ठरवण्यात आले. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गौडाप्पा पाटील, अपय्यगौडा पाटील, कलगौडा पाटील, बसनगौडा पाटील, गुंडू कुरेन्नवर, अमृत मुदेनावर, सिदलिंग मुद्देनावर, दुडाप्पा होसपेठ, दयानंद घेवडी, हनमंत बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.









