बेळगाव : शहर परिसरात सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने विविध मंदिरांतून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी बाजारात श्रीकृष्ण मूर्ती, मटकी आणि पूजेच्या साहित्याची खरेदी झाली. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी श्रीकृष्ण मूर्ती आणि दहीहंडीसाठी लागणाऱ्या माठांची विक्री वाढली होती. साधारण 60 ते 500 रुपयांपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती तर 50 ते 250 रुपये अशी माठांची किंमत होती. बाजारात फळे, फुले, पाने, बेल, दुर्वा आदी पूजेच्या साहित्याची मागणीही वाढली होती.
विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम
गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी अभिषेक, पूजा-अर्चा, आरती, पाळणा गीत आणि महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. इस्कॉनच्या राधा गोकुळानंद मंदिरात जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. समादेवी गल्ली येथील श्रीपंत वाड्यात कार्यक्रम आयोजित केला आहे.
उद्या गोपाळकाला (दहीहंडी)
मंगळवार दि. 27 रोजी दहीहंडी म्हणजे गोपाळकाला उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध आकारांच्या आकर्षक मटक्यांची विक्री झाली आहे. त्याबरोबरच गोविंदा पथकांकडूनही तयारी केली जात आहे. विशेषत: मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये जवानांकडून दहीहंडी फोडली जाणार आहे.









