अध्याय एकतिसावा
नाथमहाराज म्हणाले, श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र हजर असतात. त्यामुळे ते येथे नाहीत तेथे गेले किंवा तेथून येथे आले ह्या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही. फक्त देवादिकांना स्वत:च्या कर्तृत्वाचा आणि सर्वज्ञ असल्याचा गर्व झाला असल्याने ही बाब लक्षात आली नव्हती. त्यामुळे ते श्रीकृष्णनाथ येथून जातील, जाताना आपल्या घरी येतील, येताना त्यांनी वैकुंठातील आणलेल्या संपत्तीतील काही भाग आपल्याला देतील इत्यादि कल्पना लढवत बसले होते. तेव्हढ्यात परमाद्भुत महिमा असलेले भगवंत निजधामाला निघून गेले. ह्या सर्व प्रकाराने देवगणांना झालेला अभिमान मात्र गळून पडला. अभिमान गळून पडल्याने देवगण अत्यंत विनम्र झाले. त्यांनी श्रीकृष्णनाथांची स्तुती करायला सुरवात केली. श्रीकृष्णाचा अगाध महिमा जाणल्याने, आश्चर्यचकित झालेल्या देवांना श्रीकृष्णाची कितीही स्तुती केली तरी मुळीच समाधान वाटेना. पूर्वी अनेकदा सांगितलेले श्रीकृष्ण महात्म्य शुकमुनी परीक्षित राजाला पुन्हा सांगू लागले. राजा परीक्षितही ते ऐकण्यासाठी सरसावून बसला.
शुकमुनी म्हणाले, राजा ऐक. जगात जे जे काही घडतंय त्याला कारण केवळ श्रीपती होय. माया सर्वांना नाचवत असते पण सर्वांना नाचवण्यासाठी आवश्यक असलेली चेतनाशक्ती श्रीकृष्णनाथच तिला पुरवत असतात. ज्याला काळा, गोरा असा वर्ण नाही, ज्याला कसलेही रूप नाही किंवा कोणतेही गुण नाहीत तो श्रीकृष्ण स्वत:च्या लीलेने यदुवंशी प्रकट झाला. जो सर्व वंशांचा वंशज आहे, जो सकळ गोत्रांचा गोत्रज आहे, जो सर्व जातींचा जाती आहे असा श्रीकृष्ण सर्वांचा सोयरा आहे. त्याने यदुवंशात जन्म घेऊन आयुष्यभर अनेक लीला केल्या. शेवटी कुलाचा क्षय करून निजधर्म निभावला. हे सर्व त्याचे योगमायेच्या सत्तेने केलेले लीलाकर्म होय. योगमायेच्या सत्तेने मत्स्यकूर्मादि अवतार घेण्याइतकी श्रीकृष्णनाथाची अतर्क्य योग्यता होती. श्रीकृष्ण हा केवळ अवतार नव्हता तर पूर्णावतार होता. त्याचे चरित्र अतिअतर्क्य असल्याने ब्रह्मादि रुद्र ह्यांनाही माहित नव्हते. आरशाचे उदाहरण देत शुकमुनी पुढे म्हणाले, आरसा हातात घेऊन त्यात बघितले की, माणसाला त्याचे प्रतिबिंब दिसते आणि तो बाजूला केला की ते दिसायचे बंद होते. त्याप्रमाणे यदुवंशरुपी आरशात श्रीकृष्णनाथांनी डोकावून बघितले. त्यामुळे त्यांचा त्या वंशात जन्म झाला. आरशात हावभाव करून मनुष्य स्वत:ची छबी पाहतो त्याप्रमाणे त्यांनी हालचाली केल्या. नंतर आरसा बाजूला केल्यामुळे त्यात प्रतिबिंब दिसायचे बंद झाले. ह्याचा अर्थ त्यांचे निधन झाले असा कुठे होतो काय? पण लोक त्याला श्रीकृष्णाचे निधन झाले असे म्हणतात. श्रीकृष्णाचे निधन ही निश्चितच मायिक गोष्ट असल्याने मिथ्या आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य निरनिराळ्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करतो, त्याला अनुकूल वेशभूषा करतो आणि नाटकाचा प्रयोग संपला की, स्वत:च त्या भूमिकेचा वेश उतरवून ठेवतो परंतु असे केले तरी त्या व्यक्तीच्या अस्तित्वात काहीच फरक पडत नसल्याने ती व्यक्ती आहे तशीच असते.
यादववंशात जन्मलेले श्रीकृष्णनाथ त्यांनी केलेल्या सर्व कर्मात अलिप्त राहिले ह्यात विशेष ते काय? जो सृष्टीची निर्मिती करतो, पालन करतो आणि शेवटी संहार करतो आणि एव्हढे सगळे करूनही त्यापासून अलिप्त राहतो त्याला यदुवंशात जन्म घेऊन केलेल्या कर्मातून अलिप्त राहणे काय अशक्य आहे? विशेष म्हणजे, कुणाकडूनही कसल्याही मदतीची अपेक्षा न करता श्रीकृष्णनाथ सृष्टीची निर्मिती स्वत: करतात. तिचा प्रतिपाळ करून शेवटी संहारही करतात आणि हे सगळे करून ते स्वत: शिल्लक उरतात. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती, प्रतिपाळ आणि संहार करणारे श्रीकृष्ण त्या सृष्टीपासून अलिप्त असतात.
क्रमश:








