ई -ऑक्शन प्रक्रियेची अधिसूचना जारी : प्रथम चार खाणपट्टय़ांचा होणार लिलाव,शिरगाव, मये, डिचोली, कालेचा समावेश
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले असून लिलाव प्रक्रिया मार्गी लावून सरकारने खाण व्यवसायाचा श्रीगणेशा केला आहे. त्यामुळे राज्यभरातील खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अशा प्रकारे खाणी चालविण्यासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच लिलाव प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात चार खाण ब्लॉकची निवड करण्यात आली असून काल शुक्रवारी निविदा सूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आठ खाण ब्लॉक लिलावासाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र सध्या चारच ब्लॉकचा लिलाव करण्यात येणार असून उर्वरित ब्लॉकचाही टप्प्याटप्प्यानी लिलाव करण्यात येणार आहे.
शिरगाव, मये, डिचोली, कालेचा समावेश
सध्या निश्चित करण्यात आलेल्या चार ब्लॉकमध्ये शिरगाव, मये व डिचोली आणि दक्षिण गोव्यातील काले येथील खाणीचा समावेश आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी एमएमटीसी ही केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपनी नियुक्त करण्यात आली असून त्याकामी तिला एसबीआय पॅपचा सहयोग मिळणार आहे.
दोन कायद्यांतर्गत चार खाणपट्टय़ांची निश्चिती
खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम 1957 च्या कलम 10 (बी) अंतर्गत तसेच खनिज (लिलाव) नियम 2015 नुसार सरकारने चार चार प्रमुख खाणपट्टे निश्चित केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानंतर खाणी बंद
राज्यात खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्नशील होते. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचीच फलश्रृती म्हणून लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यापर्यंत कार्य पुढे गेले आहे. राज्यातील 88 लीजांचे दुसऱयावेळी नूतनीकरण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्च 2018 मध्ये राज्यातील खाणकाम ठप्प झाले होते.
लिलाव प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत चालणार
दि. 15 ते 21 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती खाण खात्यातील सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी मये आणि शिरगाव येथील खाणी अनुक्रमे चौगुले आणि बांदेकर या कंपन्यांकडून चालविण्यात येत होत्या. डिचोलीतील खाण सेसा वेदांता कंपनी तर काले येथील खाण पूर्वी नार्वेकर यांच्या नावे होती.
राज्य सरकारने खाणपट्टे मंजूर करण्यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले असून इच्छुक कंपनीने 15 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी निविदा दस्तऐवज खरेदी करणे आवश्यक आहे. तांत्रिक बोली सादर करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर ही आहे.
खाणी सुरु होणार असल्याने उत्साहाचे वातावरण
सध्या लिलावासाठी काढण्यात आलेल्या चारही खाणपट्टय़ांची व्याप्ती सुमारे 268 हेक्टर एवढी आहे. खाणी सुरू होणार असल्याच्या वृत्ताने राज्यात खाणपट्टय़ात लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खाण कामगारांसह ट्रक व्यावसायिक, मशिनरी मालक, बार्जमालक याबरोबरच गॅरेज, स्पेअरपार्टस, टायर या व्यवसायातील लोकांसह हॉटेल, खानावळचालक यांचा समावेश आहे.