उद्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची पर्वणी : सप्ताहाची पूर्वतयारी पोहोचली अंतिम टप्प्यात,आज स्वराधीश डॉ. भरत बलवळ्ळी यांचे गायन
वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला उद्या मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. भजनी सप्ताहानिमित्त आज सोमवार दि. 21 रोजी श्री दामोदर पुन:प्रतिष्ठापना दिनी धार्मिक विधी जोशी कुटुंबीयांतर्फे होणार आहे. वर्षपद्धतीप्रमाणे उत्सव समितीतर्फे सायंकाळी 7 वा. मंदिरासमोर उभारलेल्या मंडपात डॉ. भरत बलवळ्ळी यांच्या खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक श्रीपाद शेट्यो व संजय शेट्यो यांच्या सौजन्याने या खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री दामोदर भजनी सप्ताह यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यंदा कोणत्याही प्रकारचे निर्बंध भाविकांवर तसेच पार व गायनाच्या बैठकांवर नाहीत. सर्व ज्ञाती समाजांचे पार व गायनाच्या स्वतंत्र बैठका होतील. सप्ताहाची पूर्वतयारी अखेरच्या टप्प्यात आलेली आहे. यंदा सप्ताहानिमित्त भरगच्च फेरी भरायला सुरुवात झाली आहे. वास्कोतील विन्सन वर्ल्ड यांच्यातर्फे शहरातील हुतात्मा चौकात भव्य प्रवेशव्दाराची कमान उभारण्यात आलेली आहे. शहरात भजनी सप्ताहाचा माहोल फेरीच्या आगमनाने तयार झालेला आहे. आजपासून पुढील आठ ते दहा दिवस उत्सवाचा माहोल फेरीच्या रूपाने कायम राहणार आहे. स्वराधीश डॉ. भरत बलवळ्ळी यांना तबल्यावर दत्तराज शेटये, पखवाजवर किशोर तेली, ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, फ्लूट रोहित वनकर, साईड रिदम योगेश रायकर साथसंगत करतील. ध्वनी संयोजन बंटी फोंडेकर तर निवेदकाची बाजू गोविंद भगत सांभाळतील. डॉ. बलवळ्ळी यांच्या कार्यक्रमापूर्वी सायंकाळी 5 वा. भजन व त्यानंतर भरतनाट्याम नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.









